डॉक्टरला शिवीगाळ; कर्मचाऱ्यास मारहाण
By Admin | Updated: June 30, 2015 23:20 IST2015-06-30T23:20:14+5:302015-06-30T23:20:14+5:30
रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या वादात डॉक्टरला शिवीगाळ आणि आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार वाघोली येथील प्राथमिक

डॉक्टरला शिवीगाळ; कर्मचाऱ्यास मारहाण
वाघोली : रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या वादात डॉक्टरला शिवीगाळ आणि आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडला. मारहाणीच्या निषेधार्थ आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले
लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी साजिद शेख, सलमान शेख, नदीम शेख व गणेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळच्या सुमारास साजिद शेख उपचारांकरीता आला होता. काही कारणामुळे शेख याचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्याबरोबर वाद झाले. उपचारानंतर शेख काही तरूणांना घेवून आरोग्य केंद्रात आला. त्याच्या बरोबरच्या तरूणांनी व त्यानेही कर्मचारी आर. जी. घ्यार यांना मारहाण करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली.
कर्मचाऱ्यांनी तात्काळ सदरची घटना पोलिसांना कळविली. वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेराव यांनी फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मारहाणीच्या प्रकारानंतर आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांनी काम बंद करून घटनेचा एकत्रितपणे निषेध केला.
काम बंद झाल्यामुळे अनेक रूग्णांना ताटकळत बसावे लागले. उपचार होणार नसल्यामुळे काही नागरीक उपचार न करताच परत गेले. जवळपास दोन तास आरोग्य केंद्र बंद अवस्थेत होते.
ग्रामस्थांच्या रेटयामुळे एक वाजता आरोग्य केंद्रामध्ये रूग्णांवर उपचार करण्यास सुरूवात झाली. रूग्णांच्या झालेल्या हाल अपेष्टांमुळे नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
लहानग्यांची काळजीच नाही
मंगळवारी आठवडे बाजार असल्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये लहान मुलांचे लसीकरणाचे कँप आयोजित केले जातात. सकाळी कर्मचाऱ्याला झालेल्या मारहणीनंतर सर्व कामकाज बंद करण्यात आले. लहान मुलांना घेवून आलेल्या सर्व पालकांना मात्र रिकाम्या हाताने परतावे लागले. लसीकरण सुरू होईल या आशेने अनेक पालक तेथेच तळ ठोकून होते. परंतु कर्मचाऱ्यांनी रूग्ण आणि लहानग्यांकडे दुर्लक्षच केले.
आरोग्य केंद्राच्या कर्मचा-यास मारहाण झाल्यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे रूग्णांचे आतोनात हाल झाले. पोलिसांच्या पातळीवर कारवाई होईलच परंतु परिसरातील सर्वात मोठे शासकीय रूग्णालय असल्याने कर्मचा-यांनी रूग्णांना विनाकारण वेठीस धरले.
- विनायक कड, ग्रामस्थ