पुणे : डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या इन्स्ट्राग्राम सोशल अकाउंटवर चॅटिंग झाले असल्याचे सायबर तज्ज्ञाकडून दिलेल्या अहवालामधून समोर आले आहे. एका अटक आरोपीने खेवलकर ला ' माल चाहिए क्या? ....वाला? असे विचारले असता खेवलकर याने ' ठेवून घ्या? असे होकारार्थी उत्तर दिले. अशाप्रकारे अमली पदार्थ अशा पद्धतीने पार्टी करता आणल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच प्रांजल खेवलकरांच्या फोन मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट मिळाले आहेत. अशाप्रकारे अमली पदार्थ अशा पद्धतीने पार्टी करता आणल्याचे स्पष्ट होत असल्याची माहिती तपास अधिका-यांनी न्यायालयात दिली.
दरम्यान, पाचही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, येरवडा कारागृहात आरोपीची रवानगी करण्यात आली आहे. अमली पदार्थांसह पार्टीप्रकरणात आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने खेवलकर सह पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. डॉ. खेवलकर यांचा दुसरा मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप आणि घटनास्थळावरून मिळालेले डीव्हीआर तसेच इतर सहा आरोपींचे जप्त मोबाईल व पेन ड्राईव्ह यांचा सायबर तज्ज्ञांकडून सविस्तर स्पष्ट अहवाल पुढील दोन दिवसांत प्राप्त होणार आहे. त्या अहवालावरून आरोपींकडे चौकशी करायची आहे. हुक्का तयार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित करायचा आहे. आरोपींच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमधून मोठ्या प्रमाणात डेटा मिळाला असून त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील योगेश कदम यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. ऋषिकेश गानू, ॲड. विजयसिंग ठोंबरे, ॲड. पुष्कर दुर्गे, ॲड. सचिन झालटे-पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
डॉ. प्रांजल खेवलकर (वय ४१, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी ( वय ३५, रा. डीएसके सुंदरबन, माळवाडी), समीर फकीर महंमद सय्यद ( वय ४१, ऑर्किड सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), सचिन सोनाजी भोंबे ( वय ४२, डायमंड पार्क सोसायटी, वाघोली ) आणि श्रीपाद मोहन यादव ( वय २७, रा. पंचतारा नगर, आकुर्डी) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सर्व पुरुष आरोपी ह्यांच्यासोबत डॉ. खेवलकर हे संपर्कात असून, आरोपी प्राची शर्मा हिच्या सोबत देखील मी २०२२ पासून संपर्कात असल्याचे सायबर तज्ज्ञाचे अहवाल आणि साक्षीदारांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हॉटेलच्या मालकाकडे तपास केल्यानंतर त्यांनीच सांगितले की डॉ खेवलकरने २५ व २६ जुलै रोजी या दोन दिवस हॉटेलमधील रूम बुक केल्या होत्या. ते नेहमी त्यांच्याच हॉटेलमध्ये रूम बुक करतात आणि मित्र व वेगवेगळ्या मैत्रिणींसोबत रात्री पार्टी करत असतात. २०२४ व २०२५ मध्ये एकूण २० वेळा रुम बुकिंग करून एकूण ४३ दिवस तिथे राहिल्याचे रेकॉर्ड सादर केले आहे. पार्टीत अमली पदार्थ तयार करणाऱ्याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. पाहिजे असलेल्या आरोपीबाबत चौकशी केली असता आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, पार्टीच्या ठिकाणाहून प्लॅस्टिकच्या पिशवीमधून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. कारवार्इत मिळालेल्या तीन पुड्या एकत्र केल्या आहेत, अशी माहिती तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी न्यायालयास दिली.