काँग्रेस कार्यकर्त्यांवर शहराध्यक्ष लादू नका
By Admin | Updated: October 27, 2014 03:19 IST2014-10-27T03:19:53+5:302014-10-27T03:19:53+5:30
लोकसभा व विधासनभा निवडणुकीमध्ये शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले

काँग्रेस कार्यकर्त्यांवर शहराध्यक्ष लादू नका
पुणे : लोकसभा व विधासनभा निवडणुकीमध्ये शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले असून, पराभवातून सावरणाऱ्या नेतृत्वाची काँग्रेसला आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांवर शहराध्यक्ष लादू नका, अशी एकत्रित मागणी ब्लॉक अध्यक्ष करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतरही काँग्रेसची पडझड थांबलेली नाही. शहरातील काँग्रेसच्या दिग्गज आमदारांचा पराभव झाला. त्यामुळे शहरातील आठही जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. संपूर्ण शहर व जिल्ह्यातील एकूण २१ जागांपैकी केवळ भोरची जागा वगळता काँग्रेसच्या उमेदवारांचा सर्व ठिकाणी पराभव झाला आहे. तर १५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. शहरातील सहा ठिकाणी काँग्रेस उमेदवार स्पर्धेतही राहिले नाहीत. त्यामुळे आगामी महापालिकेच्या दृष्टीने काँग्रेस नेतृत्वाने धोक्यांची घंटा ओळखली पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवून सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे.
गेल्या ८ ते १० वर्षांपासून शहर काँग्रेसचे नेतृत्व अॅड. अभय छाजेड यांच्याकडे होते. त्या काळात काँग्रेसने भरभराटही पाहिली अन् आता ओहोटी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून छाजेड यांनी राजीनामा दिला.
मात्र, कॉँग्रेस अडचणीच्या काळात असताना त्यांनी राजीनामा न देता नेतृत्वाचे कसब दाखविणे गरजेचे आहे, अशी ब्लॉक अध्यक्षांची भावना आहे. पंडित नेहरू स्टेडियमचे ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले, की पूर्वी लोकसभा, विधानसभा ते महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटप करताना ब्लॉक अध्यक्षांना विश्वासात घेतले जायचे. शहरातील आठ मतदारसंघांत १२ ब्लॉक अध्यक्ष ही काँग्रेसची खरी ताकद आहे. ती वाढविण्याचा प्रयत्न अभय छाजेड यांनी केला आहे. मे २०१५ ला लोकशाही मार्गाने निवडणुकी होईपर्यंत छाजेड यांनीच नेतृत्व केले पाहिजे.
त्या पार्श्वभूमीवर सर्व ब्लॉक अध्यक्षांची एकत्रित बैठक दोन दिवसांत होणार आहे. पर्वती ब्लॉकचे कार्याध्यक्ष सतीश पवार म्हणाले, काँग्रेसच्या पराभवातून कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी मनोबल वाढविणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारे खंबीर व सक्षम नेतृत्वाची गरज आहे. (प्रतिनिधी)