भीक नको, हाताला काम द्या!

By Admin | Updated: May 29, 2014 05:04 IST2014-05-29T05:04:00+5:302014-05-29T05:04:00+5:30

भीक नको, हाताला काम द्या, सन्मानाने जगू द्या. अशी आर्त विनवणी तृतियपंथीयांच्या वतीने करण्यात आली आहे.

Do not begging, let's work on hand! | भीक नको, हाताला काम द्या!

भीक नको, हाताला काम द्या!

संजय माने, पिंपरी  - भीक नको, हाताला काम द्या, सन्मानाने जगू द्या. अशी आर्त विनवणी तृतियपंथीयांच्या वतीने करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तृतियपंथीयांच्या बाबतीत नुकत्याच दिलेल्या निर्णयाने त्यांना सन्मान आणि अधिकार प्राप्त झाला आहे. स्त्री, पुरुष याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे तृतियलिंगी (थर्ड जेंडर) अशी कायद्याने मान्यता दिली. निवडणूक आयोगाने निवडणूक लढविण्याचे अधिकार दिले. कायद्याने अधिकार, सन्मान दिला असला तरी समाजाने स्वीकारावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील तृतियपंथीयांसाठी काम करणार्‍या आधार संस्थेचे अध्यक्ष दलजितसिंग ऊर्फ सुनीलभाऊ यांनी तृतियपंथीयांना काम द्यावे, असे आवाहन केले आहे. साफसफाई असो की आणखी कोणतेही काम असो ते करण्याची आमची तयारी आहे. कष्टाचे दाम मिळावे, असे आम्हालासुद्धा वाटते. अवहेलना, अवमान सहन करत भीक मागून जीवन जगणे असह्य झाले आहे. यापूर्वी तृतियपंथीयांची कशातच गणना होत नव्हती. स्त्री, पुरुष या दोहोंपैकी एकातही मोडत नसल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हायचे तरी केसपेपरवर नेमका उल्लेख काय करायचा? रुग्णालयाने उपचार करण्याची तयारी दाखवली तरी नेमक्या कोणत्या वॉर्डात दाखल करून घ्यायचे असा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व कटकटींना सामोरे जाण्यापेक्षा उपचार न घेता, दुखणे अंगावर काढणे त्यांना भाग पडते. तृतियपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याने शिक्षण, कार्यकुशलता असूनही त्यांना काम करण्याची संधी मिळत नाही. काम मिळाले तरी हावभाव, वागण्या बोलण्यातील बदल लक्षात येताच, कामावरून कमी केले जाते. त्याचे उदाहरण देताना सुनीलभाऊ म्हणाले, माझा चेला असलेल्या अमृताला कॉलसेंटरमध्ये चांगली नोकरी होती. तृतियपंथीय असल्याचे लक्षात येताच संबंधित कंपनीने कामावरून कमी केले. सिमरनकडे एमएची पदवी आहे. निशाचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. कशिशचे इंग्रजी माध्यमातून १२ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. उत्तम इंग्रजी बोलता येते. किरण पदवीधर आहे. समुद्रीने इंटरियर डिझायनरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. एका ठिकाणी नोकरीसुद्धा मिळाली, पण तृतियपंथीय असल्यामुळे अल्पावधित ती नोकरी गमवावी लागली. कामाचे कौशल्य असूनही समाजमनाने न स्वीकारल्यामुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. आमची काम करण्याची तयारी आहे, सामाजिक भान असलेल्या संस्थांनी काम दिल्यास समाजात चांगला संदेश जाईल. समाजमन बदलण्यास तो उपयुक्त ठरेल, अशी तृतियपंथीयांना अपेक्षा आहे.

Web Title: Do not begging, let's work on hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.