खोटी भांडणे करून फसवू नका

By Admin | Updated: February 17, 2017 05:22 IST2017-02-17T05:22:25+5:302017-02-17T05:22:25+5:30

मी कोणती विकासकामे केली त्यावर बोलतो. तुम्ही काय केले त्यावर बोला’ असे आव्हान देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

Do not be fooled by false arguments | खोटी भांडणे करून फसवू नका

खोटी भांडणे करून फसवू नका

पुणे : ‘मी कोणती विकासकामे केली त्यावर बोलतो. तुम्ही काय केले त्यावर बोला’ असे आव्हान देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यावर खोटी भांडणे करीत जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी नाशिक महापालिकेत तसेच पुण्यातील मनसेच्या नगरसेवकांनी केलेल्या विविध कामांचे छायाचित्रांच्या साह्याने सादरीकरणही केले. सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही, त्यामुळेच ते एकमेकांवर चिखलफेक करीत असून त्याचा जनतेशी काहीही संबध नाही, असे ते म्हणाले.
व्यासपीठावरून पक्षाच्या विकासकामांचे छायाचित्रांसह सादरीकरण करीत प्रचारसभेत एक वेगळाच रंग ठाकरे यांनी भरला. कौटुंबीक अडचणींमुळे प्रचार सभा घेण्यास उशीर झाला असे सुरुवातीलाच स्पष्ट करून ते म्हणाले, ‘‘ मुंबईत २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे, ठाण्यात आहे. पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी १० वर्षे सत्तेत आहेत. इतकी वर्षे सत्ता भोगूनही आता ते पुन्हा आम्ही हे करणार असेच सांगत आहेत. मग इतकी वर्षे काय करत होते, हे त्यांना तुम्ही विचारणार आहात की नाही? ’’
कसलीही विकासकामे सांगता येत नाहीत, म्हणून शिवसेना भाजपाने भांडणाची क्लृप्ती शोधली. माझ्या प्रचारसभा सुरू झाल्या व परत त्यांच्यावरचा फोकस निघाला. त्यामुळे आता सामनावर बंदी घाला असे नवे पिल्लू काढले आहे. इतक्या वर्षांच्या सत्तेतही त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. मनसेची नाशिकमध्ये फक्त ५ वर्षे सत्ता होती. या ५ वर्षांत काय केले ते पहा, असे सांगत ठाकरे यांनी या कामांचे सादरीकरणच केले. त्याचे निवेदनही त्यांनीच केले. अशाच प्रकारची कामे पुण्यात करू. एकदा संधी द्या. मुळा-मुठेचा काठ आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाही केला तर मग सांगा, असे ते म्हणाले.
ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. ठाकरे यांचे आगमन होईपर्यंत नगरसेविका पुष्पा कनोजिया, रूपाली पाटील, वसंत मोरे, बाबू वागस्कर, किशोर शिंदे या नगरसेवकांची भाषणे झाली. ठाकरे यांच्यासमवेत माजी आमदार बाळा नांदगावकर, सरचिटणीस अनिल शिदोरे, शहराध्यक्ष हेमंत संभूस व अजय शिंदे आदी होते. नगरसेवक बाळा शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Do not be fooled by false arguments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.