भावनिक होऊ नका, योग्य पर्याय निवडा
By Admin | Updated: June 17, 2014 02:13 IST2014-06-17T02:13:06+5:302014-06-17T02:13:06+5:30
दहावीचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये उत्साह आहे.

भावनिक होऊ नका, योग्य पर्याय निवडा
पुणे : दहावीचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये उत्साह आहे. मात्र त्याचबरोबर अपेक्षित गुण मिळतील का? याचे दडपणही त्यांच्या मनावर असते. निकाल हाती आल्यानंतर कमी गुण मिळालेले किंवा अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी निराश होतात. अशा विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज असते. तो आधार पालक देऊ शकतात. तर अपेक्षित किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी अतिउत्साह न दाखविता योग्य मार्गदर्शन घेत विविध पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थी व पालकांनी निकालानंतर भावनिक न होता, परिस्थिती स्वीकारून विविध पर्यायांचा सकारात्मक विचार करण्याचा सल्ला समुपदेशकांनी
दिला आहे.
शालेय जीवनातून महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता दहावी. या टप्प्यावर किंबहुना त्या आधीपासूनच पालक आपल्या मुलांच्या करिअरचा विचार करतात. त्यादृष्टीने दहावी परीक्षेच्या निकालाला खूप महत्त्व असते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवरून त्यांची पुढील दिशा ठरवली जाते. आज दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांची उत्सुकता ताणली गेली आहे, तेवढेच दडपणही आहे. किती गुण मिळणार? हा एक प्रश्न सर्वांसमोर असणार आहे. मात्र, या प्रश्नाचे त्यांना अपेक्षित असलेले उत्तर मिळेलच असे नाही. काहींच्या पदरी निराशा येईल, तर काहींना अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळतील. या दोन्ही स्थितीमध्ये काही विद्यार्थी व पालक भावनिक होऊन परिस्थितीही जुळवून घेण्यात अपयशी ठरतात. कोणताही विचार न करता निर्णय घेऊन मोकळे होतात. मात्र, तो निर्णय पुढे घातक ठरतो. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसह अपेक्षित गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही योग्य पर्यायांचा सारासार विचार करूनच निर्णय घेण्याची गरज आहे. यामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे समुपदेशकांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे समुपदेशक प्रा. बी.डी. गरूड म्हणाले, दहावी हा करिअरच्यादृष्टीने मुलांचा पाया असतो. त्यामुळे साहजिकच अपयश आल्यानंतर मुले निराश होतात. मात्र त्यांनी धीर सोडू नये. भावनाशील न होता मुलांसह पालकांनी त्याचा स्वीकार करायला हवा. दहावीला दोन विषयांसाठी एटीकेटी असल्याने अशा विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे अनुत्तीर्ण झाल्यानंतर कोणतेही वाईट विचार मनात न आणता पर्यायांचा विचार करावा. यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचीही अनेकवेळा द्विधा मनस्थिती होते. पालकांनीही मुलांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये.