नदीपात्रातील एक दगडही उचलू देणार नाही
By Admin | Updated: January 21, 2015 00:25 IST2015-01-21T00:25:46+5:302015-01-21T00:25:46+5:30
दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने विठ्ठलवाडी ते वारजे या नदीपात्रातील रस्त्याचे काम १५ दिवसांच्या आत उखडून टाकण्याचे आदेश नुकतेच महापालिकेला दिले

नदीपात्रातील एक दगडही उचलू देणार नाही
पुणे : दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने विठ्ठलवाडी ते वारजे या नदीपात्रातील रस्त्याचे काम १५ दिवसांच्या आत उखडून टाकण्याचे आदेश नुकतेच महापालिकेला दिले असले, तरी या ठिकाणचा एक दगडही पालिकेला हलवू न देण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी मंगळवारी दिला. तसेच, या ठिकाणी पालिकेचा जेसीबी फिरकल्यास आधी तो आमच्या अंगावरून फिरवावा लागेल, अशा शब्दांत आपला संतापही या नागरिकांनी व्यक्त केला. लवादाच्या निर्णयानंतर महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह मंगळवारी या रस्त्याची पाहणी करून या परिसरातील नागरिकांशी चर्चा केली.
दरम्यान, या प्रकरणी महापालिका स्थानिक नागरिकांच्या समवेत असून, कोणतेही बांधकाम काढण्यात येणार नाही. तसेच, या रस्त्याची सद्य:स्थिती सर्वोच्च न्यायालयात मांडून हा निकाल महापालिकेच्या बाजूने लागावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन धनकवडे यांनी रहिवाशांना दिले.
लवादाच्या निर्णयानुसार, या रस्त्यासाठीचा बांध काढल्यास पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. हा बांध नसताना पाणी शिरल्याने एका नागरिकाला आपला प्राण गमवावा लागला असून, नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिली.
पथ विभागाचे प्रमुख विवेक खरवडकर, नगरसेवक श्रीकांत जगताप, नगरसेविका मंजूषा नागपुरे, माजी नगरसेवक बाळासाहेब कापरे, शैलेश चरवड, काका चव्हाण, हेमंत जगताप, कुमार गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नदीपात्रातील पाणी सोसायट्यांत घुसत असल्याने पालिकेने या ठिकाणी बांध घातला होता. त्यानंतर त्या ठिकाणी रस्ता प्रस्तावित करण्यात आला. मात्र, ही बाब पालिकेकडून लवादासामोर योग्य पद्धतीने न मांडली गेल्याने ही वेळ ओढावली असून, सर्वोच्च न्यायालयात तरी प्रत्यक्ष स्थिती योग्य पद्धतीने मांडली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यासाठी पालिकेला आवश्यक असलेली सर्व माहिती देण्याची तयारी या वेळी नागरिकांनी दर्शविली, तसेच या परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार असून, ते न्यायालयात सादर करण्याची मागणी करण्यात आली.
हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. तसेच, तो काढला गेल्यास पावसाळ्यात समस्या निर्माण होईल. त्यामुळे महापालिका लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांची मदतही घेण्यात येईल.
- कुणाल कुमार, आयुक्त
नदीपात्रात विठ्ठल मंदिर ते वारजे (बाह्यवळण महामार्ग) हा रस्ता सिंहगड रस्त्याला पर्यायी म्हणून समजला जातो. रस्ता मार्गी लागल्यास धायरीपासून सिंहगडपर्यंत जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता मिळणार आहे. सध्या सिंहगड रस्त्यावरून दांडेकरपूल ते धायरीपर्यंत रोज सरासरी साडेतीन लाख वाहने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याचीच आहे. ही वाहतूक विठ्ठल मंदिरापासून वारजे बाह्यवळण मार्गाकडे वळविण्यासाठी हा रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला आहे. त्यामुळे धायरीच्या पुढे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता उपलब्ध होणार असून, सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. तसेच, सिंहगड रस्ता ते वारजे हे अंतरही अडीच ते तीन किलोमीटरवर येणार आहे.
या रस्त्यासाठी महापालिका स्थानिक नागरिकांच्या समवेत आहे. हा रस्ता काढला जाणार नाही. लवादाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असून, येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल. त्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नेमणूकही करण्यात येणार आहे.
- दत्तात्रय धनकवडे, महापौर