रंगला ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा

By Admin | Updated: January 31, 2017 02:59 IST2017-01-31T02:59:07+5:302017-01-31T02:59:07+5:30

परळच्या कामगार क्रीडा भवन येथे जीवनविद्या मिशन आयोजित, ५० वा ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा नुकताच पार पडला. सद्गुरू वामनराव पै यांचे सत्शिष्य

Dnyaneshwar Mauli Poonasamaran Sohala in color | रंगला ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा

रंगला ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा

मुंबई : परळच्या कामगार क्रीडा भवन येथे जीवनविद्या मिशन आयोजित, ५० वा ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा नुकताच पार पडला. सद्गुरू वामनराव पै यांचे सत्शिष्य शिवाजीराव पालव यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून जीवनविद्या मिशनच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेले कार्य उपस्थितांच्या डोळ्यांसमोर उभे केले.
या दोनदिवसीय सोहळ्यात कार्यक्रमात संतशिरोमणी ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ, नामधारकांना जीवनविद्या तत्त्वज्ञानामुळे आलेल्या अनुभवांचे सुखसंवाद, काही शिष्यांची चक्रीप्रवचने, जीवनविद्या मिशनच्या उपक्रमांविषयी ध्वनिफितीद्वारे माहिती, लहानांपासून थोरांपर्यंत डोळ्याचे पारणे फेडणारी पारंपरिक दिंडी व नामघोष, तसेच प्रबोधनाच्या माध्यमातून जीवनविद्येच्या कार्याचा ऐतिहासिक प्रवास, असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
१९५२ सालापासून श्रीसद्गुरू जीवनविद्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रवचने, कीर्तने, व्याख्याने, आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रम अशा माध्यमातून कार्य करू लागले. वामनराव पै यांनी १९५५ साली जीवनविद्येचा प्रचार व प्रसार करण्यासाठी, नामसंप्रदाय मंडळ व आताचे जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी संस्थेची स्थापना केली. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद, दैववाद, भ्रष्टाचार, दुराचार, व्यसनाधीनता दूर करून समाजात वैचारिक क्रांती घडवून आणण्यासाठी, सद्गुरू वामनराव पै यांनी जीवनविद्या तत्त्वज्ञानाची निर्मिती केली. त्या काळी जीवनविद्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी संस्थेने सुरू केलेल्या अनेक समाजोपयुक्त उपक्रमांत, दरवर्षी ‘ज्ञानेश्वर माउली पुण्यास्मरण सोहळा’ आयोजित करण्यात येत असे. सुरुवातीला हा सोहळा ‘ज्ञानेश्वर माउली समाधी उत्सव’ या नावाने साजरा करण्यात येत असे. मात्र, काही वर्षांनी या सोहळ्याचे ‘ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा’ असे नामकरण करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Dnyaneshwar Mauli Poonasamaran Sohala in color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.