‘दिवाळी भेट’
By Admin | Updated: October 31, 2015 01:12 IST2015-10-31T01:12:13+5:302015-10-31T01:12:13+5:30
जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ग्रामपंचायतींना शासनाने ‘दिवाळी भेट’ दिली आहे. ८३ ग्रामपंचायतींना ३ कोटी १९ लाख ६८ हजार ६५ रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून

‘दिवाळी भेट’
पुणे : जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ग्रामपंचायतींना शासनाने ‘दिवाळी भेट’ दिली आहे. ८३ ग्रामपंचायतींना ३ कोटी १९ लाख ६८ हजार ६५ रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून, थेट त्या त्या ग्रामपंचायतींच्या खात्यात हा निधी वर्ग करण्यात आला आहे. यामुळे येथील विकासकामांना गती मिळणार आहे.
राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाच्या ५ टक्के निधी देण्यात येतो. या पेसा ग्रामपंचायतींना हा थेट निधी देण्यात यावर्षी २१ एप्रिल रोजी शासनाने मान्यता दिली होती.
यानुसार २०१५-१६ साठी या योजनेसाठी २५८.५० कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील आंबेगाव पंचायत समितीतील ३६ ग्रामपंचायतींमधील ६३ गावे व जुन्नर पंचायत समितीतील ४७ ग्रामपंचायतींतील ६५ गावांना याचा फायदा होणार आहे. येथील १ लाख १२ हजार २३१ लोकसंख्येकरिता दरडोई रु. ४०६.९१ याप्रमाणे ४ कोटी ५६ लाख ६८ हजार ६६४ इतका निधी उपलब्ध होणार आहे. यापैकी आता दरडोई २८५.८४ रुपयांप्रमाणे ३ कोटी १९ लाख ६८ हजार ६५ रुपये मिळाले असून ते थेट त्या ग्रामपंचायतींच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले. हा निधी संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभेने त्या अंतर्गत येणाऱ्या गाव, वस्ती, वाडी व पाडा यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)