दिव्यांग बांधवांनी मंजुरीसाठी दिलेली प्रकरणे हरवली, मोर्चा काढण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:37+5:302021-06-09T04:13:37+5:30
आंबेगाव तालुक्यात ३५०० दिव्यांग असून २७४३ दिव्यांग संजय गांधी योजनेचा लाभ घेतात. या योजनेतून ८०० रु. ते १००० ...

दिव्यांग बांधवांनी मंजुरीसाठी दिलेली प्रकरणे हरवली, मोर्चा काढण्याचा इशारा
आंबेगाव तालुक्यात ३५०० दिव्यांग असून २७४३ दिव्यांग संजय गांधी योजनेचा लाभ घेतात. या योजनेतून ८०० रु. ते १००० रु. मानधन मिळते. अडचणीच्या काळात या योजनेचा खूप मोठा आधार दिव्यांग बांधवांना होतो. अलीकडच्या काळात या योजनेकडे तहसीलदार तसेच अधिकारी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या कार्यालयात दिव्यांग बांधवांनी मंजुरीसाठी दिलेली प्रकरणे हरवली आहेत. शोध घेऊनही ती सापडत नाहीत. सहा ते आठ महिन्यांपासून मंजूर झालेली प्रकरणे पत्रांअभावी धूळ खात पडून आहेत. तलाठी यांजकडे पोच करण्यास दिलेली संजय गांधी योजनेची पत्रे तलाठी सांगूनही घेऊन जात नाहीत. नवीन प्रकरणे मंजूर होऊनसुद्धा ६ महिन्यांपासून काही दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात पेन्शनचे पैसे आजपर्यंत जमाच केलेले नाहीत. तसेच काही विधवा निराधार योजनेच्या खात्यावर १०० रू प्रतिमहिना एवढी अल्प रक्कम जमा केली जाते. तसेच इतर जिल्ह्यांतील सर्व दिव्यांग बांधवांना सरसकट १००० रू. पेन्शन सुरू झालेली असतानाही याच तालुक्यातील दिव्यांग बांधवांना या लाभापासून वंचित ठेवले गेले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत या योजनेचा १०० टक्के लाभ दिला जातोय. तहसीलदार यांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणून देखील त्यांच्या दुर्लक्षपणामुळे आंबेगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत आहे. यासंबंधी तहसीलदार मॅडम भेटू देत नाही. फोन केल्यावर फोन घेत नाहीत. मेसेज केल्यावर संबंधित अधिकारी यांचा नंबर दिला जातो. संबंधित अधिकारी यांना फोन केला असता फोन बंद केलेला असतो. येणाऱ्या आठवड्यांत दिव्यांग संघटना जिल्हाधिकारी यांजकडे यासंबंधी तक्रार दाखल करणार असून, तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन करणार आहेत, असा इशारा दिव्यांग संघटना व सेवा संस्था यांच्या वतीने समीर टावरे, सुनील दरेकर, ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिला आहे.
यासंदर्भात तहसीलदार रमा जोशी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.