विभागीय आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह; बैठकांमुळे अधिकाऱ्यांमध्ये धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:05+5:302021-03-17T04:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या एक वर्षापासून पुणे जिल्ह्यासह विभागाची कोरोनाची संपूर्ण जबाबदारी पेलणाऱ्या पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ ...

विभागीय आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह; बैठकांमुळे अधिकाऱ्यांमध्ये धास्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या एक वर्षापासून पुणे जिल्ह्यासह विभागाची कोरोनाची संपूर्ण जबाबदारी पेलणाऱ्या पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवार (दि.१६) रोजी कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला. यामुळे शुक्रवारपासून काल सोमवार पर्यंत आयुक्तांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयातील पुनर्वसन विभागातील तहसिलदार सुरेखा दिवटे देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सौरभ राव यांच्यासह सर्वच जिल्हाधिकारी असो की अन्य सर्व प्रमुख अधिकारी दिवस रात्र फिल्डवर राहून काम करत होते. परंतु पहिल्या लाटेत बहुतेक सर्व अधिका-यांनी कोरोनाला दहा हात लांबच ठेवले होते. परंतु कोरोनाच्या या दुस-या लाटेत बहुतेक सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी कोरोनाच्या विळाख्यात सापडताना दिसत आहेत. गेल्या पंधरा दिवसांतच अनेक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने कार्यालये बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
विभागीय आयुक्त झाल्यानंतर अनेक महत्वाचे निर्णय आणि नियोजन त्यांच्या स्तरावर होत होते. याच अनुषंगाने शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर बैठकीला राव हजेरी लावली होती. तसेच सोमवार (दि.१५) रोजी देखील त्यांनी कार्यालयात उपस्थित राहून बैठका घेतल्या. यामुळेच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.