इंदापूर शहरातील महामार्गाला दुभाजक
By Admin | Updated: February 17, 2017 04:37 IST2017-02-17T04:37:15+5:302017-02-17T04:37:15+5:30
आधीच अपुरी रुंदी असणाऱ्या शहरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्तेदुभाजक टाकण्याचे काम युद्धपातळीवर

इंदापूर शहरातील महामार्गाला दुभाजक
इंदापूर : आधीच अपुरी रुंदी असणाऱ्या शहरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्तेदुभाजक टाकण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
ज्यांचे प्रपंच केवळ महामार्गाच्या दळणवळणावरच अवलंबून आहेत, असे फळविक्रेते, किरकोळ व्यावसायिक, वडापावविक्रेते यांचे पुनर्वसन, नित्याची वाहतूककोंडी, वाहनथांब्यांच्या प्रलंबित समस्येवर उपाय काढण्याकडे सरळ दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे आगामी काळात महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेला या वर्गाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अकलूज नाक्याजवळ बाह्यवळण रस्ता झाला. त्यानंतर तेथून ते सरडेवाडी टोलनाक्यापर्यंतचे रस्तारुंदीकरण तीन टप्प्यांत करावयाचे ठरले. त्यानुसार अकलूज नाका ते तिरुपती पेट्रोल पंप, बाबा चौक ते इंदापूर महाविद्यालय हे दोन टप्प्यात सदोष स्वरूपात रुंदीकरण झाले. नगर परिषद निवडणुकीच्या काळापुरते हे काम अत्यंत वेगात चालू होते. नंतर त्यामध्ये ढिलाई झाली. आता या रस्त्यावर दुभाजक बसवण्याच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, वर नमूद कळीच्या मुद्द्यांचा विसर पडला आहे.
नगरपालिकेसमोरील प्रांगणाला विनाकारण कुंपण घातल्याने तिथे पार्किंग होणाऱ्या गाड्या आधीच मुख्य रस्त्यावर पार्क होऊ लागल्या आहेत. पंचायत समिती, बसस्थानक, काँग्रेस भवनच्या परिसरात हातगाडीवाले व्यवसाय करत आहेत. त्यामुळेही तेथील रस्त्याची रुंदी अधिकच कमी झाली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना उसाचे ट्रॅक्टर, लग्नसराईत पंचायत समितीसमोर मारुती मंदिरात येणाऱ्या लग्नाच्या वराती,काही किलोमीटर वाचवायचे अथवा अवैध प्रवाशांची ने-आण करायची यासाठी बाह्यवळण रस्ता सोडून शहरातूनच घुसणारे अवजड ट्रक. भरीत भर म्हणून बेलगाम वेगात पळणाऱ्या वाळूच्या गाड्या. ही वाहतूक जर या रस्तादुभाजक असणाऱ्या रस्त्यावरून चालणार असेल तर काय होईल, हाच प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर)