महामार्गावरील दुभाजक तोडले
By Admin | Updated: April 6, 2016 01:25 IST2016-04-06T01:25:47+5:302016-04-06T01:25:47+5:30
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर कापूरव्होळनजीक हरिश्चंद्री व वर्वे गावच्या हद्दीतील इंडियन आॅइल कंपनीच्या पेट्रोल पंपासमोरच्या मुख्य रस्त्याच्या सुरक्षिततेचा भाग तोडून

महामार्गावरील दुभाजक तोडले
कापूरव्होळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर कापूरव्होळनजीक हरिश्चंद्री व वर्वे गावच्या हद्दीतील इंडियन आॅइल कंपनीच्या पेट्रोल पंपासमोरच्या मुख्य रस्त्याच्या सुरक्षिततेचा भाग तोडून त्याचा अवैध दुभाजक संबंधित पेट्रोल पंपचालक-मालक यांनी तयार केला आहे. हरिश्चंद्री येथे पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहने, तर वर्वे येथे साताराकडून पुण्याकडे जाताना पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी या पंपावर अचानक वाहने वळतात व याच वेळेस पुण्याहून साताऱ्याकडे जाणारी वाहनेही सर्व्हिस रोड; तसेच मुख्य मार्गावरून वेगाने जात असतात, तर याच वेळी मुख्य रस्त्यावरून इंडियन आॅइलच्या पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकीस्वारही अचानक वळतात. त्यामुळे या ठिकाणी छोटे-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती हरिश्चंद्री व वर्वे गावच्या नागरिकांनी प्रतिनिधीला दिली.
याबाबत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, इंडियन आॅइल कंपनीच्या पेट्रोल पंपाचे चालक-मालक यांनी मुख्य रस्त्याचे संरक्षक कठडे जवळ जवळ शंभर फुटांपेक्षाही अधिक तोडलेले दिसले.
पंपाचे मालक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. तोडलेले दुभाजक हे चालक-मालकांच्या फायद्याचा असून, शासनाच्या नियमानुसार अवैध बेकायदेशीर असल्याचे म्हणने वर्वे व हरिश्चंद्रीच्या नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शासन लाखोंचा खर्च करून महामार्गाच्या दोन्ही बाजूस सिमेंट काँक्रीटचे कठडे उभारत आहेत, तर पावसाचे पाणी रस्त्यावर येऊ नये ते बाजूने वाहून जाण्यासाठी सुरक्षित गटारे उभारत आहेत.
परंतु, वैयक्तिक स्वार्थासाठी मनमानी पद्धतीने मोठे व्यावसायिक महामार्गावरील बाजूचे कठडे दुभाजक तोडून महामार्गावरील प्रवाशांसाठी धोकादायक परिस्थिती तयार करतात. तसेच, मार्गावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेली गटारे माती व मुरूम टाकून बुजवतात. त्यामुळे पावसाळ्यात जोराचा पाऊस झाल्यावर, याच गटाराचे पाणी या बुजवलेल्या ठिकाणाहून मुख्य रस्त्यावर येणार असून, महामार्गावर अपघात होणार आहेत.
काही वर्षांपूर्वी शिंदेवाडी, ता.भोर येथील कात्रज घाटानजीक पावसाच्या पाण्यात मायलेकी वाहून गेल्याची घटना घडली होती. त्याचीच परत पुनरावृत्ती होणार काय, आणि अशा घटना घडल्यावरच शासन पुन्हा जागे होणार काय, असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. अशा प्रकारे हे व्यावसायिक नफा कमविण्यासाठी प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत, असे वाहनचालकांनी सांगितले. (वार्ताहर)