जि. प. सदस्यावर हल्ला!
By Admin | Updated: November 3, 2015 03:28 IST2015-11-03T03:28:46+5:302015-11-03T03:28:46+5:30
जमीनमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांना रॉकेल टाकून तसेच दगडाने मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तर एकावर रॉकेल टाकण्याचा गंभीर

जि. प. सदस्यावर हल्ला!
बावडा : जमीनमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांना रॉकेल टाकून तसेच दगडाने मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तर एकावर रॉकेल टाकण्याचा गंभीर प्रकार सोमवारी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे घडला.
बावडा येथील शेतकरी मारुती भिसे यांची शेतजमीन ढोले यांनी काही दिवसांपूर्वी विकत घेतली होती. त्या जमिनीची मोजणी करून ढोले यांना ताबा देण्यात येणार होता. त्यानुसार शासकीय मोजणीदार, सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात मोजणी सुरू होती. या वेळी अचानक ढोलेविरुद्ध शेतकऱ्यांनी व भिसे यांच्या शेतात अतिक्रमण करणाऱ्यांनी समूहाने एकत्रित येऊन अडथळा आणला. त्याच वेळी एकाने ढोले यांच्या अंगावर फेकण्याच्या उद्देशाने रॉकेल डबा आणला. तसेच, इतरांनी दगड घेऊन ढोले यांचा पाठलाग केला. मात्र, प्रसंगावधान राखून ते त्यांच्या घरात गेल्याने हल्ल्यातून बचावले. या वेळी जमिनीचे मूळ मालक नागेश भिसे यांच्या अंगावर रॉकेल टाकण्यात आले. त्यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी इंदापूर पोलिसात तक्रार दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी तत्काळ इंदापूरला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी २५ ते ३० जणांच्या विरोधात भिसे यांनी तक्रार दिली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य ढोले यांनी लाखेवाडी येथील ६ जणांपासून आपल्या जीविताला धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे, त्यांच्यावर कारवाई करावी, असे लेखी पत्र इंदापूर निरीक्षकांना दिले होते.
पोलिसांवर आरोप....
जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी या घटनेला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार घडत असताना सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी हस्तक्षेप केला नाही. उघड्या डोळ्याने हा प्रकार पाहूनही फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली, असा आरोप त्यांनी केला.