आलिशान मोटारीच्या धडकेत मंडल अधिकारी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:13 IST2021-09-12T04:13:24+5:302021-09-12T04:13:24+5:30

पुणे : भरधाव वेगाने जाणाऱ्या आलिशान कारने रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी मंडल अधिकारी महिलेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू ...

District officer killed in luxury car crash | आलिशान मोटारीच्या धडकेत मंडल अधिकारी महिलेचा मृत्यू

आलिशान मोटारीच्या धडकेत मंडल अधिकारी महिलेचा मृत्यू

पुणे : भरधाव वेगाने जाणाऱ्या आलिशान कारने रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी मंडल अधिकारी महिलेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. सेनापती बापट रोडवरील पॅव्हेलियन मॉलसमोर गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजता हा अपघात घडला.

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी कारचालक अक्षय महादेव एकडे (वय २५, रा. श्रेयश अपार्टमेंट, ई- स्क्वेअरसमोर, मॉडेल कॉलनी) याला अटक केली आहे. रिना सीताराम मुंढे ऊर्फ रिना सचिन मडके (वय ३२, रा. वारजे माळावाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी सचिन नारायण मडके (वय ३५, रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची पत्नी रिना या सेनापती बापट रोडवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात मंडल अधिकारी म्हणून काम करीत होत्या. गुरुवारी सायंकाळी कार्यालयातील काम संपल्यावर त्या घरी जाण्यासाठी पायी निघाल्या होत्या. सेनापती बापट रोडवरील पॅव्हेलियन मॉलसमोर रस्ता ओलांडून पलीकडे बसस्टॉपवर जाण्यासाठी पादचाऱ्यांना मार्ग ठेवण्यात आला आहे. रिना मडके या तेथून रस्ता ओलांडून दुभाजकावर आल्या तेथून पुढे उरलेला अर्धा रस्ता ओलांडत होत्या. अक्षय एकडे हा त्याची आलिशान कार घेऊन विद्यापीठ कॉर्नरवरून वेताळबाबा चौकाच्या दिशेने वेगाने जात होता. त्याने रस्ता ओलांडणाऱ्या रिना यांना जोरात धडक दिली. त्यात रिना या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक माळी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: District officer killed in luxury car crash