वितरिकांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 11, 2017 04:19 IST2017-05-11T04:19:04+5:302017-05-11T04:19:04+5:30
नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. मात्र, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका अजूनही कोरड्याच आहेत.

वितरिकांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
लासुर्णे : नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. मात्र, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका अजूनही कोरड्याच आहेत. या भागातील विहिरी व विंधनविहिरींनी तळ गाठला आहे. या भागातील शेतपिके व जनावरांचा ओला चारा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नीरा डावा कालव्यावरील वितरिका
क्र. ४२ व ४३ यांना पाणी सोडण्याची मागणी होत आहे. इंदापूरच्या
पश्चिम भागातील वितरिकांना
नीरा डावा कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.
सध्या नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. आर्वतन सुरू होऊन ५० दिवस उलटले, तरीदेखील इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका क्र. ४२ व ४३ ला पाणी सोडले नाही. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलच या भागातील विहिरी व विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. या भागातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. नीरा डावा कालव्यावरील विनापरवाना सायफन जोरात सुरू असल्याने बड्या धेंडांची चलती होत आहे. तर, छोटे शेतकरी मात्र पाण्याची वाट पाहत आहेत.
या भागात कालव्यावर अनधिकृत सायफनचे मोठ्या प्रमाणावर जाळे आहे. त्यामुळे पाणी कमी दाबाने मिळत असल्याने शेतीचे भरणे होत नाही. याचा फटका मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसत आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर मोहीम राबवून अनधिकृत सायफनधारकावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत. या भागात राजकीय पुढाऱ्यांचीदेखील अनधिकृत सायफन असल्याने त्याच्यावर कारवाई करताना अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.
यावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता, या वर्षी उष्णतेची दाहकता जास्त आहे. इंदापूरच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असल्याने आपल्याला पिण्यासाठी पाणी सोडावे लागले. तसेच, या वर्षी उष्णतेमुळे पाण्याचे बष्पीभवन आणि शेतातदेखील पाणी जास्त द्यावे लागत आहे. या वितरिकांना पाणी सोडण्यास विलंब होत आहे. १४ तारखेला या वितरिकांना पाणी सोडू, असे त्यांनी सांगितले.