अंतर तेच; पुणे-शिरूरला वेळ मात्र तिप्पट

By Admin | Updated: December 27, 2014 22:51 IST2014-12-27T22:51:24+5:302014-12-27T22:51:24+5:30

कंटेनर आणि लग्नकार्यासाठी मंगल कार्यालयात येणारी वाहने रस्त्यावरच पार्क केल्याने पुणे-अहमदनगर रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे.

Distance; Pune-Shirur time triple time | अंतर तेच; पुणे-शिरूरला वेळ मात्र तिप्पट

अंतर तेच; पुणे-शिरूरला वेळ मात्र तिप्पट

अभिजित कोळपे ल्ल पुणे
चौकाचौकांतील अतिक्रमणे, ठिकठिकाणी रस्त्यावरच उभे असलेले कंटेनर आणि लग्नकार्यासाठी मंगल कार्यालयात येणारी वाहने रस्त्यावरच पार्क केल्याने पुणे-अहमदनगर रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. पुणे ते अहमदनगर एकूण अंतर १२० किलोमीटर. पैकी पुणे ते शिरूर ६५, तर शिरूर ते अहमदनगर ५५ किलोमीटर.
पुण्याहून शिरूरला पोहोचण्यासाठी अडीच तास लागतात. मात्र, शिरूरहून नगरला पोहोचण्यासाठी फक्त पाऊण तासच लागतो. त्याचे मुख्य कारण पुणे ते शिरूर रस्त्यावर बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमण आणि पार्किंग असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
ऊसवाहतूक, चंदननगरचे भाजी मार्केट आणि मोठ्या प्रमाणात गोडाऊन या रस्त्यावर असल्याने जड वाहतुकीचे प्रमाणात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. चंदननगर, खांदवेनगर, चोखी दाणी, सत्यम पार्क, वाघोली, केसनंद फाटा, मरकळ चौक, चाकण, पाबळ आणि कारेगाव या प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पुणे ते नगर या संपूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. मात्र, शिरूरपर्यंत ६५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल अडीच तासांचा वेळ लागत आहे. मात्र, शिरूर ते नगर असा ५५ किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त पाऊण तास पुरेसा असल्याचे शुक्रवारी प्रत्ययास आले. याचे मुख्य कारण या ५५ किलोमीटरच्या मार्गावर शिस्तीत वाहतूक होत असल्याने कमी वेळ लागतो.
पुणे ते शिरूर मार्गावर केवळ अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येमुळे याउलट परिस्थिती निर्माण होत आहे. ही परिस्थिती कमी टाळण्यासाठी ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी काळजी घेण्याची नितांत गरज असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

पुणे-नगर रस्त्यावर अनेक गावांचे आठवडेबाजार भरतात. त्यामुळे भाजीविक्रेते हे रस्त्यावर विक्रीसाठी बसतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. आम्ही बऱ्याचदा बाजार समिती प्रमुखांना आणि भाजीविक्रेत्यांना आत बसण्याचे आवाहन करतो. मात्र, आम्हाला त्यांचा प्रतिसाद मिळत नाही. आमच्याकडे वाहतूक नियंत्रकांची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करता येत नाही.
- नितीन गोकावे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

उड्डाणपुलासाठी आमच्याकडे निधीच नाही
पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली, कोरेगाव भीमा आणि शिक्रापूर येथील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबर चर्चा झाली. आम्ही त्यांना तसे निवेदन दिले आहे. मात्र निधी नसल्याने आम्ही सध्या काही करून शकत नसल्याचे पत्र आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, असे पुणे ग्रामीणचे वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांनी सांगितले.

सर्व्हिस रस्ता झाला पार्किंग रस्ता
४पुणे-नगर मार्गावर फक्त चंदननगर ते वाघोली या दरम्यान सर्व्हिस रस्ता केला आहे. परंतु या रस्त्यावरच खासगी वाहने मोठ्या प्रमाणात पार्किंग करण्यास सुरुवात झाल्याने याचा वापर पूर्ण बंद झाला आहे. स्थानिक वाहतूक त्यामुळे मुख्य रस्त्यावरून सुरू झाली आहे. याचा परिणाम दिवसेंदिवस वाहतूककोंडीत भर पडत आहे. हा सर्व्हिस रस्ता तातडीने खुला करणे गरजेचे असल्याचे मत अ‍ॅड. मंदार संकपाळ यांनी व्यक्त केले.

दुभाजक तोडून होतेय वाहतूक
४खांदवेनगर, उबाळेनगर, सत्यम पार्क आणि चोखी दाणी परिसरात अनेक गोडाऊन असल्याने या ठिकाणी रस्त्यावरच कंटेनर उभे असतात. तसेच
येथे एका कंटेनरला वळण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळात रस्त्यावर साधारण एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. अनेक वेळा येथील दुभाजक बंद केला गेला होता. मात्र, रात्रीच्या वेळी हे
दुभाजक जेसीबी आणून काढून टाकले जात आहेत. असे अनेक वेळा घडल्याने कंटाळून वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड उभे केले आहेत. मात्र, पोलीस उपस्थित नसल्यास हे बॅरिकेड काढून येथून वाहने वळवली जातात. त्यामुळे येथील गोडाऊनचालकांवर कारवाईची मागणी स्थानिक
ग्रामस्थांनी केली आहे.

 

Web Title: Distance; Pune-Shirur time triple time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.