मतदारांमध्ये निरुत्साह
By Admin | Updated: January 19, 2015 01:54 IST2015-01-19T01:54:02+5:302015-01-19T01:54:02+5:30
जिजामाता हॉस्पिटल प्रभाग (४३) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान रविवारी शांततेत झाले. मात्र, मतदारांमध्ये कमालीचा निरूत्साह जाणवला

मतदारांमध्ये निरुत्साह
पिंपरी : जिजामाता हॉस्पिटल प्रभाग (४३) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान रविवारी शांततेत झाले. मात्र, मतदारांमध्ये कमालीचा निरूत्साह जाणवला. ३७.०२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी सकाळी मतमोजणी होणार आहे. सकाळी साडेनऊपर्यंत निकाल लागेल.
विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसचे नगरसेवक गौतम चाबुकस्वार यांनी पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला व पिंपरी विधानसभा मतदार संघातून निवडूण आले. जिजामाता रूग्णालय प्रभागातून चाबुकस्वार हे नगरसेवक म्हणून निवडूण आले होते. त्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहिर करण्यात आली होती. त्याचे मतदान आज झाले.
प्रभागात २४ मतदान केंद्रांचा सोय केली होती. पोलीस बंदोबस्तही कडक ठेवण्यात आला होता. केंद्रांवर १७४ निवडणूक कर्मचारी नियुक्त केले होते. सकाळी साडेसातला मतदान सुरू झाले. मतदानासाठी येणाऱ्यांचे प्रमाण तुरळक होते.
संवेदनशीन मतदान केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले. तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. केंद्राच्या शंभर मीटर अंतराबाहेर कार्यकर्ते मतदारांना वोटरस्लीप साठी मदत करीत होते. सकाळच्या वेळात कमालीचा निरूत्साह दिसून आला. साडेनऊपर्यंत ३.४३ टक्के मतदारांनी मतदान केले. काही केंद्रांवर शुकशुकाट होता. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना निवांत बसावे लागले. दुपारी बारापर्यंत ७.७८ टक्के मतदान झाले. बारा ते साडे तीनपर्यंत २४.२२ टक्के मतदान झाले. दुपारी टक्केवारी काही प्रमाणात वाढल्याचे
दिसले. शेवटच्या दोन तासांत रांगा लावून मतदान केले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३७.०२ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)