प्रदर्शनात व्यावसायिकांचेच प्रदर्शन
By Admin | Updated: March 10, 2015 04:53 IST2015-03-10T04:53:44+5:302015-03-10T04:53:44+5:30
महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे आयोजित फुले, फळे, भाजीपाला, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शनात बागबगिचा (नर्सरी) स्टॉलपेक्षा पदार्थांचे

प्रदर्शनात व्यावसायिकांचेच प्रदर्शन
सुवर्णा नवले, पिंपरी
महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे आयोजित फुले, फळे, भाजीपाला, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शनात बागबगिचा (नर्सरी) स्टॉलपेक्षा पदार्थांचे व वस्तूंचे विक्रीचे स्टॉल अधिक दिसून येत आहेत. काही वस्तूंचे स्टॉल हे मुंबई, पुणे या भागातील आहेत. यातील काही स्टॉल हे पवनाथडी बचत गटातील महिलांचे आहेत. व्यावसायिक स्वरूपात महापालिकेने यांना उत्पादनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे उघडपणे दिसून येत आहे. ३ दिवसांसाठी महापालिका ६ लाख रुपये खर्च करून वृक्ष संवर्धन व वृक्षारोपणाचा संदेश नागरिकांना देत आहे. मात्र, यावर व्यावसायिकांनी डल्ला मारल्याचे दिसून येत आहे. यापेक्षा महापालिकेने करमणुकीवर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे.
पवनाथडी जत्रेसारखे व्यावसायिक स्वरूप बागबगिचा वृक्षारोपण प्रदर्शनाला महापालिका व वृक्ष प्राधिकरणातर्फे दर वर्षीप्रमाणे फुले, फळे भाजीपाला, बागा व वृक्षारोपण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हे प्रदर्शन चिंचवड येथील शाहूनगरमध्ये बहिरवाडे क्रीडांगणावर भरवले आहे. यंदाचे हे २२वे वर्ष
आहे. वृक्षारोपण स्पर्धेमध्ये या
वर्षी ४७ स्टॉल सहभागी झाले आहेत. मात्र, यातील काही स्टॉल रिकामे आहेत, तर काही स्टॉल हे व्यावसायिकांसाठी आहेत. यामुळे पवनाथडी जत्रेचे दुसरे स्वरूप या प्रदर्शनाला प्राप्त झाले आहे.
यामध्ये कपड्यांचे, आईसस्क्रीमचे, मसाला, लोणची, पापड, पुस्तकांचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचा कल वृक्षारोपण प्रदर्शनाकडे न राहता वस्तू खरेदीकडे दिसून येत आहे. नागरिकांचा एकूण ३ दिवसांच्या प्रदर्शनासाठी सहभाग कमी मिळालेला आहे. शहरातील नागरिकांच्या मनात महापालिकेच्या वतीने भरविण्यात आलेले जत्रा अथवा प्रदर्शन म्हणजे व्यावसायिकांच्या उत्पादनासाठीचे ठिकाण आहे, असा समज घर करून बसला आहे.
प्रदर्शन भरविण्याचा हेतू असफल
शहरातील नागरिकांना वृक्षारोपण करण्याचा संदेश मिळावा. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरात व घराबाहेर बागबगिचा करावा, या उद्देशाच्या हेतूने पालिकेने हे
प्रदर्शन भरवले आहे. शहरातील नागरिकांना व शहराबाहेरील नागरिकांना या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी आहे. मात्र, शहराबाहेरील नागरिक यामध्ये विविध वस्तूंचे स्टॉल लावून बसले आहेत. यामुळे वृक्षारोपण व संवर्धनाचा महापालिकेचा हेतू कितपत साध्य झाला, हा मोठा प्रश्न आहे.
नर्सरीसाठी पालिकेने वृक्षांच्या निगेसाठी काही उपाययोजना केलेल्या नाहीत, असे मत नर्सरीचालकांनी व्यक्त केले आहे. वृक्षारोपण प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, याकरिता महापालिकेच्या वतीने जाहिरात करण्यात आली नाही. यामुळे नागरिकांंचा प्रतिसाद अत्यल्प मिळालेला आहे.