विस्थापित धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी, हेलपाट्यांमुळे नैराश्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:55 IST2018-09-09T00:55:14+5:302018-09-09T00:55:35+5:30
भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे.

विस्थापित धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी, हेलपाट्यांमुळे नैराश्य
पाईट : भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. वारंवार इशारा देऊनही पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल होत नाहीच, शिवाय कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने नैराश्य आल्याने अखेर जलसमाधीचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ-सुतार (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भामा आसखेडच्या बॅकवॉटरवर असलेल्या रौंधळवाडी गावाच्या हद्दीत बबन सखाराम रौंधळ यांच्या घरासमोरील जलाशयात आत्महत्या केली. यावेळी काही महिला कपडे धुत होत्या. त्यांच्यासमोरच गुंजाळ यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. गुंजाळ यांची भामा आसखेड धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे. ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी दादही मागितली होती. पात्र ३८८ खातेदारांना ६५ टक्के रक्कम भरून त्यांचे पुनर्वसन करा, असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मात्र, भामा आसखेड प्रशासनाने त्यातील पात्र-अपात्रच्या फेºयात खातेदारांना घेतले आहे. वारंवार असंख्य हेलपाटे मारूनही फाईल मारण्याचे प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून गुंजाळांनी जलसमाधी घेतली.
गुंजाळ यांना ४ एकर देय क्षेत्र मंजूर झाले होते. परंतू, पात्रता यादीवर कुटुंबसंख्या न लिहल्याने व त्यासाठीची कागदपत्रे वारंवार मागितल्याने ते पुरते निराश झाले होते. त्यांच्या एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या २१
होती. त्याचे देय क्षेत्र ७ एकर मिळणे अपेक्षीत होते.