भोर शहरातील कचरा प्रश्न गंभीर
By Admin | Updated: February 14, 2015 00:07 IST2015-02-14T00:07:07+5:302015-02-14T00:07:07+5:30
शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या १५ दिवसांपासून बंद असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

भोर शहरातील कचरा प्रश्न गंभीर
भोर : शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या १५ दिवसांपासून बंद असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे; मात्र त्याकडे भोर नगरपलिका प्रशासन व पदाधिकारी डोळेझाक करीत आहेत.
३१ जानेवारीपासून भोर नगरपलिकेच्या कचरावाहतूक करणाऱ्या घंटागाड्या बंद आहेत. त्यामुळे कचराकुंड्या भरून वाहत आहेत. तेथे जागा नसल्याने शहरात जागोजागी नागरिक कचरा टाकत आहेत. त्याचा उग्र वास सुटला असून त्यातून रोगराई वाढू लागली आहे.
दरम्यान, भोर नगरपलिकेकडून एका डंपरने शहरातील कचराकुंड्यांत टाकलेला कचरा उचलण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, रस्त्यावर कचरा पडलेला आहे.
भोर शहरातील कचरावाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या टेंडरची मुदत संपल्याने पुन्हा टेंडर मागवून कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र, नगराध्यक्ष सभा घेत नसल्याने या टेंडरला मंजुरी देता येत नसल्यानेच काँग्रेसचे नगरसेवक सांगतात.
चार बैठका घेतल्या; मात्र बैठकीत नगरसेवक गोंधळ करून कामकाज चालवू देत नाहीत. दुसऱ्या बाजूला बैठक घेत नसल्याचा आरोप करतात. १६ जानेवारीच्या बैठकीचा अजेंडा सर्वांना दिला आहे. शिवाय, कचऱ्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना मुख्याधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यांनी कार्यवाही केली नाही. शहरातील कचरा उचलण्यासाठी मागवलेल्या टेंडरपैकी एकही ठेकेदार शासनमान्यता प्राप्त नाही. त्यामुळे नव्याने टेंडर मागवून ठेका द्यावा, असेही सांगितले होते. मात्र, नगरसेवक हाच ठेका मंजूर करण्याचा आग्रह धरत आहेत. यात माझी काय चूक आहे, असे नगराध्यक्षा दीपाली शेटे यांनी सांगितले. (वार्ताहर)