असंतुष्टांची कलमाडींशी भेट
By Admin | Updated: February 13, 2017 02:19 IST2017-02-13T02:19:55+5:302017-02-13T02:19:55+5:30
काँग्रेसच्या विद्यमान कारभाराविषयी नाराज असलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांची त्यांच्या निवासस्थानी

असंतुष्टांची कलमाडींशी भेट
पुणे : काँग्रेसच्या विद्यमान कारभाराविषयी नाराज असलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व पुण्याचे नेतृत्व करा अशी मागणी केली. महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या अनेकांचा या शिष्टमंडळात समावेश होता. कलमाडी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत ‘वेट अॅण्ड वॉच’ असा सल्ला दिला. सध्या कोणतेही वेगळे पाऊल उचलू नका असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती मिळाली.
प्रभाग क्रमांक १६मधील काँग्रेसच्या उमेदवार सुजाता शेट्टी यांचे पती, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्यासह शिक्षण मंडळाच्या माजी सदस्या संगीता तिवारी, अय्याज काझी, द. स. पोळेकर, राजा चाटे, राजा मगर, उमेश कंदारे, ज्ञानदेव भंडगे, महापालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सुधीर काळे आदी सुमारे ७० जणांनी कलमाडी यांची भेट घेतली व त्यांच्याकडे पक्षाच्या विद्यमान नेत्यांबाबत तक्रारी केल्या.
महापालिका निवडणुकीतील उमेदवारी वाटपापासून काँग्रेसमध्ये असंतुष्टांची एक भली मोठी फौजच तयार झाली आहे. ऐनवेळी उमेदवारी जाहीर करणे, एबी फॉर्मचे वाटप कोणालाही न कळविता शहरातील एका हॉटेलमधून करणे, पक्षात बाहेरून आलेल्यांना तत्काळ उमेदवारी बहाल करणे यामुळे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते, पदाधिकारी संतप्त झाले आहेत. त्यातील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी संगीता तिवारी यांच्यासह अनेक नाराज महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी तर काँग्रेस भवन समोर भजनकीर्तन करून जाहीरपणे आपला निषेध नोंदवला आहे, तर काहींनी पक्षाच्या प्रचारातून बाजूला राहणे सुरू केले आहे.
अशा सर्व नाराजांनी कलमाडी यांना पक्षातील स्थिती अत्यंत वाईट झाली असल्याचे सांगितले. उमेदवारी मिळाली नाही म्हणून तक्रार नाही तर उमेदवारी नाकारल्यानंतर समजुतीचे चार शब्द सांगण्याचीही गरज नेतृत्वाला वाटली नाही याबद्दलची खंत अनेकांनी व्यक्त केली. बाहेरून आलेले लोक पक्षाचे नेतृत्व करू लागले आहेत, त्यांना पुण्यातील काहीही माहिती नाही. चुकीच्या माहितीवर विसंबून निर्णय घेतले जातात, त्यामुळे वैयक्तिक एखाद्याचे नाही तर पक्षाचे नुकसान होत आहे व त्यातून वैयक्तिक फायदा घेतला जात आहे अशी टीका करण्यात आली.
पुण्याचे नेतृत्व करण्यासाठी पावले उचला अशी विनंतीही या गटाच्या वतीने करण्यात आली. कलमाडी यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. आपण सध्या कार्यरत नाही, त्यामुळे यावर काही करू शकत नाही असे ते म्हणाले. पक्षातच राहा, वेगळे पाऊल उचलू नका, थोडे दिवस थांबा व नंतर पाहा असा सल्लाही त्यांनी नाराजांना दिला असल्याचे सांगण्यात आले. नाराजांनी घेतलेल्या कलमाडी यांच्या या भेटीमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)