तळेघर येथील पशुवैद्यकीय इमारतीची दुरवस्था
By Admin | Updated: February 8, 2017 02:47 IST2017-02-08T02:47:13+5:302017-02-08T02:47:13+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अखेरची घटका मोजत आहे.

तळेघर येथील पशुवैद्यकीय इमारतीची दुरवस्था
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अखेरची घटका मोजत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण खोऱ्यातील जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न सतत भेडसावत असल्यामुळे काही वर्षांपूर्वी भीमाशंकर खोऱ्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या अशा तळेघर येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला.
यामुळे भीमाशंकर खोऱ्यातील कोंढवळे, निगडाळे, राजपूर, तेरुंगण, तळेघर चिखली या गावांना या पशुवैद्यकीय दवाखान्याचा चांगलाच लाभ मिळाला. परंतु याच कित्येक वर्षे बांधलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जुनी झाल्यामुळे ती आता अखेरची घटका मोजत आहे.
या दवाखान्याच्या जुन्या झालेल्या खोल्या आता पडू लागल्या असून, काही खोल्यांचे दरवाजे, खिडक्याच गायब झाल्या आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये तळेघर हे अत्यंत महत्त्वाचे व आदिवासी भागातील केंद्रबिंदूचे ठिकाण आहे. आदिवासी भागासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा येथे मिळतात.
यामुळे तळेघर येथे असणाऱ्या श्रेणी १ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये जनावरांची नेहमीच गर्दी असते; परंतु याच दवाखान्याची दुरवस्था झाल्यामुळे आदिवासी जनतेचे जनावरांच्या आरोग्याविषयी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या इमारतीच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी या विभागाचा स्टाफ थांबत नाही. या दवाखान्याच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, जनावरांच्या उपचारासाठी लागणाऱ्या साहित्याचीही दुरवस्था आढळून आली.
(वार्ताहर)