बोर्डाच्या अल्पसंख्यांक कॉलमबाबत सोशल मीडियावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:31+5:302020-12-04T04:29:31+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी भरून घेतल्या जाणाऱ्या अर्जात अल्पसंख्यांक या ११ ...

बोर्डाच्या अल्पसंख्यांक कॉलमबाबत सोशल मीडियावर चर्चा
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी भरून घेतल्या जाणाऱ्या अर्जात अल्पसंख्यांक या ११ नंबरच्या कॉलममध्ये हिंदू हा शब्द नसल्याने सोशल मीडियावर चर्चा केली जात असल्याचे दिसून आले. मात्र, राज्य मंडळातर्फे २०१३ पासून राज्य मंडळ याच पद्धतीने विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेत आहे. केंद्र व राज्य शासन आणि अल्पसंख्यांक विभागाला वेळोवेळी लागणाऱ्या आकडेवारीसाठी या पद्धतीने अर्ज तयार केला आहे, असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून राज्य मंडळातर्फे विविध प्रकारची माहिती भरुन घेतले जाते. त्यात अल्पसंख्यांक कॉलममध्ये नोन मायनॉरिटी, मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, पारसी, जैन असे पर्याय दिले आहेत. त्यात हिंदू हा पर्याय का नाही असा प्रश्न काहींनी उपस्थित करून सोशल मीडियावर वाद उभा केला. परंतु, परदेशातून आलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना पर्याय निवडता यावा, यासाठी नॉन मायनॉरिटी हा पर्याय दिला आहे. जसे ‘एससी’, ‘एसटी’, ‘ओबीसी’ आणि ‘इतर’ असा पर्याय दिला जातो त्याच पद्धतीने मायनॉरिटी कॉलमध्ये ‘नोन मायनॉरिटी’ हा पर्याय दिला आहे, असे बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून सांगितले जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे म्हणाल्या, राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्य मंडळाने या पद्धतीचा परीक्षा अर्ज तयार केला आहे.तसेच केंद्र व राज्य शासनाला आणि अल्पसंख्यांक विभागाला आवश्यक असणारी माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्यासाठी २०१३ पासून याच पद्धतीने अर्ज भरून घेतला जात आहे. त्यात अलीकडच्या काळात कोणताही बदल केलेला नाही.