दौंड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची खांदेपालटाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST2021-09-02T04:22:40+5:302021-09-02T04:22:40+5:30

दौंड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. १२ पैकी ११ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, तर केवळ एक ...

Discussion of reshuffling of Daund Panchayat Samiti chairperson and deputy chairperson | दौंड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची खांदेपालटाची चर्चा

दौंड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची खांदेपालटाची चर्चा

दौंड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. १२ पैकी ११ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, तर केवळ एक सदस्य भाजपचा आहे. मागील सुमारे साडेचार वर्षांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच सदस्यांना सभापती व चार सदस्यांना उपसभापतिपदाची संधी दिली आहे. यामुळे ११ पैकी ९ सदस्य काही कालावधीसाठी पदावर राहिलेले आहेत.

मागील साडेचार वर्षांच्या काळात पंचायत समिती सभापतिपदी मीना धायगुडे, झुंबर गायकवाड, ताराबाई देवकाते, आशा शितोळे व हेमलता फडके यांची, तर उपसभापतिपदी सुशांत दरेकर, प्रकाश नवले, नितीन दोरगे व सयाजी ताकवणे यांची वर्णी लागली आहे. उपसभापतिपदी असलेल्या सयाजी ताकवणे यांनी राजीनामा दिला असून, ३ सप्टेंबर २०२१ रोजी नवीन उपसभापतींची निवडणूक होणार आहे. उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लिंगाळी गणातील विकास कदम यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता सध्या वर्तविली जात आहे. तर अद्यापपर्यंत सभापतिपदी हेमलता फडके कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ११ पैकी केवळ एक सदस्य यवत गणातील निशा शेंडगे या पदापासून वंचित राहिल्या असून, अखेरचे काही महिने सभापतिपदी त्यांची वर्णी लागेल या आशेवर त्या आहेत.

जिल्हा परिषद व दौंड पंचायत समितीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार राहुल कुल यांना जोरदार हादरा देत जिल्हा परिषदेच्या सहापैकी पाच, तर पंचायत समितीच्या १२ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. काही महिन्यांत या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यामुळे निवडून आलेल्या सर्व सदस्यांना पदावर संधी देत सर्वसमावेशक धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अवलंबल्याचे दिसते. मात्र याला यवत गण अपवाद ठरतो की काय, अशीही चर्चा होत आहे.

---

चौकट

बहुमत असताना सरपंचपद निसटल्याची सल

तालुक्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या यवत गावात सभापतिपद देऊन भविष्यातील राजकीय आडाखे आणखी मजबूत करण्याची संधी राष्ट्रवादीला आहे. नुकत्याच झालेल्या यवत ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल बहुमतात येऊन देखील सरपंचपद हातून गेल्याने याची सल राष्ट्रवादीत आहे. मात्र सभापतिपदी शेंडगे यांना संधी देण्यासाठी काही अंतर्गत राजकीय मतभेद असल्याचे देखील समजते.

Web Title: Discussion of reshuffling of Daund Panchayat Samiti chairperson and deputy chairperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.