फुरसुंगी-उरुळी ‘टीपी स्कीम’बाबत नागरिकांसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:22+5:302021-01-08T04:26:22+5:30
पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची प्रारुप नगर रचनेचा (टीपी स्कीम) कच्चा मसुदा महापालिकेने तयार केला आहे. ...

फुरसुंगी-उरुळी ‘टीपी स्कीम’बाबत नागरिकांसोबत चर्चा
पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची प्रारुप नगर रचनेचा (टीपी स्कीम) कच्चा मसुदा महापालिकेने तयार केला आहे. या मसुद्यावर ग्रामस्थांसोबत चर्चा केली जाणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक पालिकेने तयार केले असून ६ ते ३० जानेवारीपर्यंत फुरसुंगी ग्रामपंचायत येथे तर १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान उरुळी येथे चर्चा केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सन २०१७ मध्ये पालिका हद्दीत समावेश झालेल्या ११ गावांत फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांचा समावेश आहे. या गावात ‘टीपी स्कीम’ राबवून विकास करण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेने १ मार्च २०१९ ला घेतला. प्रशासनाने या निर्णयाच्या अनुषंगाने दोन्ही गावांचा विकास आराखडा आणि कच्चा मसुदा तयार केला. त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.
महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले, “फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांच्या टीपी स्कीमच्या कच्चा मसुद्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली जाणार आहे. संबंधितांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहून लेखी स्वरूपात म्हणणे मांडावे. आवश्यक वाटल्यास योग्य फेरबदल केले जातील.”