पुरंदर तालुक्यात युती-आघाड्यांचीच चर्चा

By Admin | Updated: January 31, 2017 03:56 IST2017-01-31T03:56:01+5:302017-01-31T03:56:01+5:30

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक आहेत. अजून कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत.

Discussion of alliance-fronts in Purandar taluka | पुरंदर तालुक्यात युती-आघाड्यांचीच चर्चा

पुरंदर तालुक्यात युती-आघाड्यांचीच चर्चा

जेजुरी : जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक आहेत. अजून कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. उलट अजूनही तालुका पातळीवरून युती
आणि आघाडीच्याच चर्चा झडत आहेत. यात पक्ष नेतेही स्वत:ला निवडणूक सोपी जावी, म्हणून एकमेकांना मदत करण्यासाठी छुप्या युतीही करण्यातच रात्रीचा दिवस करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मात्र भाजपा आणि
मनसेची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागा आहेत. तालुक्यात काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, भाजपा, मनसे यांच्यात निवडणूक होणार आहे. सुरुवातीला काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडीची जोरदार चर्चा होती. ही आघाडी झाल्यास तालुक्यातील ही निवडणूक एकतर्फी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पुणे जिल्हा काँगे्रस अध्यक्ष संजय जगताप यांनी परवा कोणत्याही परिस्थितीत पुरंदर तालुक्यात आघाडी होणार नसल्याचे स्पष्टपणे जाहीर केल्याने सेना, मनसे, भाजपा या पक्षांच्या प्रमुखांनी उचल खाल्ली आहे. गेल्या २ दिवसांपासून पक्षनेत्यांच्या युती-आघाड्यांसाठी चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत युतीही होणार आणि आघाड्याही होणारच आहेत. पण, त्या एक तर पक्षपातळीवरून अधिकृतरित्या होतील किंवा निवडणुकीत एकमेकाला छुपी मदत करून होतील. नाहीच उमेदवारी मिळाली, तर पक्षाचाच उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न होतील. येथपर्यंत सर्वांचेच प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आलेला आहे.
तालुक्यात भाजपा वगळता इतर चारही पक्षांना स्थानिक नेतृत्व आहे. ते नेतृत्व नेमकी काय भूमिका घेणार यावरच तालुक्यातील युती -आघाडी ठरणार आहे. भाजपाला पालकमंत्री गिरीश बापटांच्याच सल्ल्याने निवडणूक लढवावी लागणार आहे. यात तालुक्यात भाजपा आणि मनसेची युती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तालुक्यातील मनसेने भाजपाच्या संगीताराजे निंबाळकर यांना मदत केली होती. निंबाळकर या मनसेचे युवानेते बाबा जाधवराव यांच्या भगिनी असल्याने मनसे भाजपा युती शक्य असल्याने याबाबतची स्थानिक पातळीवरून बोलणीही झाल्याचे समजते.
मनसेने भाजपाकडे स्वत:चा बालेकिल्ला असणारा दिवे-गराडे गट स्वत:कडे ठेवून इतर तीनही गटांत भाजपाला संधी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष युतीचा निर्णय झाल्यास यात थोडाफार बदल होऊ शकतो. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (वार्ताहर)

काँगे्रसचे मनोबल उंचावले : अटीतटीच्या लढती
पुरंदर तालुक्यात नुकत्याच पार पाडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत काँगे्रसने घवघवीत यश मिळवून सासवडसह जेजुरी नगरपालिकाही ताब्यात घेतल्याने काँगे्रसची ताकद वाढलेली आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीत ही काँगे्रसने सुमारे पाऊण लाख मते मिळवलेली होती. आता पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक म्हणजेच मिनी विधानसभेचीच ही निवडणूक होऊ घातलेली आहे. यामुळे सर्वच पक्षनेत्यांची आसने डळमळीत झालेली आहेत. स्वत:चे बालेकिल्ले तरी राखण्यासाठी व काँगे्रसला रोखण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी अशा युती आणि आघाड्याही होणार आहेत.

Web Title: Discussion of alliance-fronts in Purandar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.