सीएमईमुळे बोपखेलच्या रहिवाशांची गैरसोय कायम
By Admin | Updated: May 18, 2015 05:40 IST2015-05-18T05:40:24+5:302015-05-18T05:40:24+5:30
उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूने लागल्याने दापोडी येथील कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगने (सीएमई) आपल्या हद्दीतील दापोडी-बोपखेल हा

सीएमईमुळे बोपखेलच्या रहिवाशांची गैरसोय कायम
पिंपरी : उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूने लागल्याने दापोडी येथील कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगने (सीएमई) आपल्या हद्दीतील दापोडी-बोपखेल हा वाहतुकीचा रस्ता बुधवारी (दि. १३) बंद केला. या संदर्भात अद्यापही तोडगा न निघाल्याने तेथील रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. भोसरी, विश्रांतवाडीमार्गे वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. दैनंदिन व्यवहारासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पूर्वी जिल्हा परिषदेत समाविष्ट असलेले बोपखेल गाव १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाले. बोपखेल, रामनगर आणि गणेशनगर भागात सुमारे २० हजार लोक राहतात. यामध्ये सर्वसामान्य ग्रामस्थ, तसेच लष्करी आणि निवृत्त लष्करी जवानांचा समावेश आहे. दापोडी, बोपोडी, खडकी, फुगेवाडी, कासारवाडी, तसेच पुणे शहरात जाण्यासाठी सीएमईतील रस्ता अधिक सोईस्कर आहे. या भागातील शाळा आणि महाविद्यालयांत येथील विद्यार्थी जातात. तसेच, कामासाठीही हा भाग अधिक संबंधित आहे. बोपखेल-दापोडीतून खडकीत येण्यासाठी ५ किलोमीटर अंतर पडते. मात्र, प्रवेशद्वार बंद असल्याने ग्रामस्थांना भोसरी किंवा विश्रांतवाडीमार्गे वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. ५ किलोमीटर अंतरासाठी १५ ते २० किलोमीटर अंतर कापावे लागत आहे. त्यामुळे रिक्षासाठी १५ ऐवजी ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. प्रवासाचा
खर्च वाढून वेळही खर्ची पडत
आहे. पुणे मनपा-विश्रांतवाडी-बोपखेल, पिंपरी-भोसरी-बोपखेल या मार्गावर पीएमपी बससेवा आहे.
मात्र, ती अनियमित असल्याने संबंधितांची गैरसोय होत आहे. त्यांना बसवर अवलंबून राहावे लागत आहे. दररोजच्या त्रासामुळे बोपखेलवासीय वैतागले आहेत. दुसरीकडे
सीएमईतील लष्करी जवानांना
ये-जा करण्यासाठी गणेशनगर येथून मार्ग खुला केला आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शाळा व महाविद्यालये सुरू
होत आहेत. (प्रतिनिधी)