घाणेरडे स्पर्श अन् विकृतांच्या नजरांमधून रोजच बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:14 IST2021-09-07T04:14:33+5:302021-09-07T04:14:33+5:30
पुणे : मुली, तरुणी आणि स्त्रियांसाठी भयावह होत चालल्याची भावना आहे येथील माता-भगिनींची. त्यांचा अनुभव असा आहे की, रात्री-अपरात्री ...

घाणेरडे स्पर्श अन् विकृतांच्या नजरांमधून रोजच बलात्कार
पुणे : मुली, तरुणी आणि स्त्रियांसाठी भयावह होत चालल्याची भावना आहे येथील माता-भगिनींची. त्यांचा अनुभव असा आहे की, रात्री-अपरात्री पुण्यात फिरताना पूर्वीसारखे सुरक्षित वाटत नाही. दिवसादेखील घाणेरडे स्पर्श आणि विकृत नजरा यांचा सामना करावा लागतो. घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा परतेपर्यंत त्या पूर्ण निर्भय कधीच नसतात. सुसंस्कृत, शांत, सुरक्षित अशी ओळख सांगणारे पुणे या अर्थाने बदलले आहे. अधिक धोकादायक, भयावह झाले आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर नऊ नराधमांनी अत्याचार केल्याचे वृत्त आल्यानंतर ‘लोकमत’ने पुण्यातील माता-भगिनींशी संपर्क साधला असता या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
गर्दीच्या ठिकाणी भीती वाटते. काम तर वसतिगृह या मार्गावर नदीच्या पात्रात पुलाचा परिसर येतो. त्यामुळे पुलावर थांबलेल्या पुरुषांच्या घोळक्याचे दडपण येते. शारीरिक नसला तर शाब्दिक अत्याचार हा नेहमीचा झाला आहे. मुख्यतः मुलींच्या वसतिगृहाच्या जवळच्या परिसरात मुलांची गर्दी ही ठरलेली असते. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आलेल्या अनुभवानुसार सध्या पुणे असुरक्षित वाटते.
- धनश्री केदारी.
एकटीने प्रवास करणे भीतिदायक वाटते. स्थानिक मुले जाणूनबुजून दुचाकीवरून प्रवास करताना कट मारून जाणे, मागे वळून पाहणे आणि अचानक थांबणे असा प्रकार करतात. गर्दीच्या ठिकाणी वाईट अर्थाने स्पर्श केला जातो. काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांवरून पुणे आता चुकीचे दिशेने जात आहे, अशी भावना मनामध्ये निर्माण होत आहे. कधीही काहीही घडू शकते असे वाटत आहे.
- पूजा भालेराव.
शहरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून राहत आहे. परंतु मनामध्ये कधी भीती निर्माण झाली नाही. महिलांसाठी तसेच तरुणींसाठी कधीही पुणे सुरक्षितच आहे. रात्रीच्या वेळी उशिरा कधी बाहेर पडत नाही. अलीकडच्या काळात वातावरणात फरक पडताना दिसून येतोय.
- वर्षा सूर्यवंशी.
शहरात दिवसा कधीही भीती वाटली नाही. उशिरा प्रवास करताना किंवा बाहेरून येत असताना मुलांचा घोळका दिसला की भीती ही वाटतेच. काही विशेष परिसर असुरक्षित वाटतात. तसेच क्वचित प्रसंगी असुरक्षित वाटते. शहरात मोकळे वातावरण असल्याने दडपण वाटत नाही. मुलींसाठी पुणे शहर कधीही उत्तमच आहे.
- शिरीन सय्यद.