अटकपूर्व जामिनासाठी संचालकांचा अर्ज

By Admin | Updated: January 10, 2017 03:35 IST2017-01-10T03:35:01+5:302017-01-10T03:35:01+5:30

ठेवीदारांच्या ठेवी, बोगस कर्ज प्रकरणे करून २ कोटी ६३ लाख २६ हजार ९४७ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी वारजे

Directors' application for anticipatory bail | अटकपूर्व जामिनासाठी संचालकांचा अर्ज

अटकपूर्व जामिनासाठी संचालकांचा अर्ज

पुणे : ठेवीदारांच्या ठेवी, बोगस कर्ज प्रकरणे करून २ कोटी ६३ लाख २६ हजार ९४७ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी वारजे माळवाडी येथील विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजी माजी संचालक मंडळावर गुुन्हा दाखल केला असून, त्यांच्यापैकी दोघांना अटक करण्यात आल्यानंतर इतर १४ संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे़
शंकर मारुती माळी (वय ४३, रा़ वारजे माळवाडी) आणि जयसिंग कृष्णा लावंड (वय ६१, रा़ हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांच्या पोलीस कोठडीत १२ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे़
याप्रकरणी देवराम शिवराम उरीट (रा़ उरीटनगर, वारजे माळवाडी), म्हाळसाकांत गोविंदजी पाटील (रा़ वारजे), तानाजी निवृत्ती मोरे (रा़ वारजे), अंजली सुरेश सुतार (रा़ कोथरूड), माणिकशेठ तुळशीराम दुधाणे (रा़ वारजे जकात नाका, कर्वेनगर), नामदेव तान्याबा मोरे (रा़ सासर्व, ता़ कोरेगाव), प्रकाश गुंडा तरडे (रा़ वारजे माळवाडी), बबन बापू गोतपागर (रा़ आनंदनगर) बजरंग दिनकर मोरे (रा़ सासर्व, ता़ कोरेगाव, सातारा), उमेश बाबूराव जगदाळे (रा़ वारजे), ज्ञानोबा नथू वेडेपाटील (रा़ बावधन), सुरेश गेणूभाऊ दांगट (रा़ शिवणे), डॉ़ रघुनाथ आबासाहेब देशमुख (रा़ शास्त्रीनगर, कोथरूड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़ त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे़
शंकर माळी व जयसिंग लावंड यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ लावंड हे संचालक असताना त्यांनी पत्नीच्या नावाने कर्ज काढले असून, त्याची फाईल मिळत नाही़ त्याबाबत काहीही माहिती आरोपी देत नाही़ त्यांनी पतसंस्थेमध्ये बनावट शिक्के
तयार केले असून ते कोणत्या कारणासाठी केले, याची माहिती  देत नाही़ तपासात सहकार्य  करीत नसल्याचे विशेष  सरकारी वकील सुनील हांडे यांनी सांगितले़ न्यायालयाने दोघांच्याही पोलीस कोठडीत १२ जानेवारीपर्यंत वाढ केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Directors' application for anticipatory bail