पुणे - दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात अडकलेले डॉ. सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र शाखेने ठाम पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने याप्रकरणी चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, त्या चौकशीत डॉ. घैसास निर्दोष सिद्ध होतील, असा विश्वास आयएमएने व्यक्त केला आहे.या प्रकरणात सरकारीअहवालाच्या आधारे चूक कोणाची हे ठरवणार असले तरी, डॉ. घैसास यांच्यावर कोणताही दोष नसून त्यांना आरोपी ठरवणे अन्यायकारक असल्याचे मत आयएमएने मांडले आहे. डॉ. घैसास यांनी वैद्यकीय कर्तव्यप्रवणतेने काम केले असून, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे.
अशात अधिकच्या माहितीनुसार, डॉ. सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला असून, ते शहरातून पलायन करू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल समोर येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, आमदार अमित गोरखे यांनी यावर प्रतिक्रिया देत आयएमएला थेट इशारा दिला आहे. डॉ. घैसास यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आयएमएवर नाराजी व्यक्त करत, ही भूमिका खेदजनक असल्याचे सांगितले. त्यांनी हेही म्हटले की, जसे डॉ. घैसास जनतेच्या रोषाला सामोरे जात आहेत, तसाच रोष आयएमएलाही सहन करावा लागू शकतो.