स्मशानभूमी मार्ग खोदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2015 23:52 IST2015-07-02T23:52:22+5:302015-07-02T23:52:22+5:30
खोरवडी (ता. दौंड) येथील स्मशानभूमी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

स्मशानभूमी मार्ग खोदला
देऊळगावराजे : खोरवडी (ता. दौंड) येथील स्मशानभूमी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
खोरवडी ग्रामपंचायतीने गावातील मृतांच्या अंत्यविधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाच्या निधीअंतर्गत भीमा नदी परिसरात टोलेजंग स्मशानभूमी बांधण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीने या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही केली. त्यामुळे काही कालावधीसाठी अंत्ययात्रेच्या मार्गातील अडचणी दूर झाल्या. मात्र, काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर खोदाई केली.
या प्रकरणी ग्रामपंचायतीने दौंड पंचायत समिती व दौंड तहसील कचेरीमध्ये संबंधित विभागांकडे रस्ताखोदाई प्रकरणी लेखी तक्रारीही केल्या. मात्र, पंचायत समिती आणि महसूल यंत्रणेने या बाबतीत
कुठलीच कारवाई न केल्यामुळे नागरिकांना तसेच अंत्यविधीस येणाऱ्यांना या रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे. पूर्वीहा रस्ता मोठ्या प्रमाणावर लांब व रुंद असल्याने ग्रामस्थ, शेतकरी यांना वापरासाठी हा सोयीस्कर रस्ता होता. मात्र, आज ग्रामस्थ, शेतकरी, आर्वी, अनगरे येथून येणारे दुग्धव्यावसायिक, शालेय विद्यार्थी यांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याची खंत सरपंच राजेंद्र गुन्नर, भगवान सोनवणे तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केली.
याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे म्हणाले, की स्मशानभूमीचा रस्ता जर गायरान किवा गावठाण हद्दीत असेल, तर मला आदेश देता येतात. मात्र, हा रस्ता शेतातील असल्याने त्याचे आदेश देण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे. तसेच ग्रामपंचायतीने त्याची दुरुस्ती करायची असते. (वार्ताहर)