वडगावशेरीत पंधरा दिवसांपूर्वी केलेला रस्ता खोदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:05+5:302021-02-05T05:20:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वडगावशेरीतील प्रभाग क्रमांक ५ मधील जुन्या मुंढवा रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले ...

वडगावशेरीत पंधरा दिवसांपूर्वी केलेला रस्ता खोदला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वडगावशेरीतील प्रभाग क्रमांक ५ मधील जुन्या मुंढवा रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच पालिकेच्या कचरा वर्गीकरण प्रकल्पासमोरील रस्ता तयार करण्यात आला होता. हाच रस्ता इंटरनेटची केबल टाकण्यासाठी पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
जुना मुंढवा रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखलेले आहे. यामुळे नागरिक आधीच वैतागले आहेत. एकाच रस्त्याचे काम तब्बल चार ठेकेदार करीत आहेत. यांच्यात ताळमेळ नसल्यानेच रस्त्याचे काम अर्धवट झाले असुन जागोजागी खड्डे पडले आहेत. यावर ब्लॉक बसवून मलमपट्टी केली जात आहे. रस्ता तयार होत नाही तोवरच कोणतीही परवानगी न घेता खोदलाच कसा? हा संतापजनक प्रश्न उपस्थित करून नागिरकांनी खोदाईचे काम थांबबिले. यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संतप्त नागरिकांसमोरून पळ काढला.
कोट
अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्याचे काम केले जात आहे. खोदाईस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच कशी हा प्रश्न पडला आहे. कनिष्ट अभियंत्याचा अभिप्राय असल्याशिवाय परवानगी देता येत नाही. मात्र केवळ एसीमध्ये बसून संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. याची चौकशी झाली पाहिजे.
- संदीप जऱ्हाड, नगरसेवक पुणे मनपा.
------
गेल्या चार वर्षांपूर्वी रस्ता खोदाईला परवानगी दिली आहे. त्यामुळे रस्ता खोदण्यात येत आहे. नवीन रस्ता असला तरी संबंधित खासगी कंपनी नव्याने काम पूर्ण करून देणार आहे.
- अनंतराव काटकर,
(कार्यकारी अभियंता, पथ विभाग)
चौकट
पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी नाकारली. मात्र बड्या खासगी कंपनीची केबल टाकण्यासाठी परवानगी कशी देण्यात आली. कोणाच्या आशीर्वादाने विनापरवाना हे काम केले जात आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
--------------