शिक्षण क्षेत्रासाठी कठीण कालखंड

By Admin | Updated: October 12, 2015 00:58 IST2015-10-12T00:58:05+5:302015-10-12T00:58:05+5:30

सर्व्हरची क्षमता कमी असल्याने ‘सरल’ या संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेची माहिती भरण्याचे काम अवघड झाले आहे.

Difficult time for education sector | शिक्षण क्षेत्रासाठी कठीण कालखंड

शिक्षण क्षेत्रासाठी कठीण कालखंड

पुणे : सर्व्हरची क्षमता कमी असल्याने ‘सरल’ या संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेची माहिती भरण्याचे काम अवघड झाले आहे. त्यात शालाबाह्य मुलांची नोंदणी करून त्यांना शाळेत दाखल करणे, मतदार नोंदणी करणे, शालेय पोषण आहारावर लक्ष देणे, विद्यार्थी वाहतुकीबाबत आवश्यक उपाययोजना करणे, या सर्व अशैक्षणिक कामांतून विद्यार्थ्यांना वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूणच सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे शिक्षणक्षेत्र कठीण कालखंडातून जात आहे. वेळीच याकडे लक्ष दिले नाही, तर राज्याला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, असे मत मुख्याध्यापक संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
‘लोकमत’तर्फे आयोजित लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरी व ग्रामीण भागातील शाळांच्या विविध समस्या मांडल्या.
मुख्याध्यापक संघाचे पुणे शहराध्यक्ष चंद्रकांत मोहळ, जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, सहसचिव मधुकर नेक, सचिव
सुभाष वाल्हेकर यांच्यासह मुख्याध्यापक शांताराम पोखरकर, विठ्ठल कुंभार, हौशीराम कडनर, शोभा शिंपी, सविता काजरेकर, सुलभा देशमुख यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
शासनाची विविध अशैक्षणिक कामे करणारे शिक्षक व मुख्याध्यापक शिक्षण व महसूल अधिकाऱ्यांकडून वारंवार दाखविल्या जाणाऱ्या कारवाईच्या बडग्यामुळे प्रचंड तणावाखाली आहेत. ‘नोकरीचा राजीनामा देऊन सरळ घरी बसावे’ असा विचार नाइलाजास्तव त्यांच्या मनात येत आहे, अशी संतप्त भावना या वेळी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अशैक्षणिक कामाचे योग्य नियोजन करून शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे अधिकाधिक लक्ष देण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याचा शासनाने विचार करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे येणाऱ्या अडचणी, पाठ्य पुस्तकातील बदलांमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ, वर्षानुवर्षे तुकड्यांना मान्यता न दिल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न, त्याचप्रमाणे कला, क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीबाबत शासनाने स्वीकारलेले चुकीचे धोरण आदी बाबींवरही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले. या वेळी शिक्षकांनी विविध प्रश्न, येणाऱ्या अडचणी मांडल्या.
तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विविध चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण सरल प्रणालीमध्ये भरण्याचे नवीन आव्हान शिक्षक व मुख्याध्यापकांसमोर उभे राहिले आहे, असेही त्यांंनी सांगितले.
‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘मुख्याध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ‘लोकमत’चे नेहमीच सहकार्य राहिले आहे. या पुढील काळातही मुख्याध्यापक संघाशी ‘लोकमत’चे संबंध अधिक दृढ होतील. (प्रतिनिधी)

Web Title: Difficult time for education sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.