धोमबलकवडीच्या कालव्याला राहणार बारमाही पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:53+5:302021-09-06T04:14:53+5:30
भोर: शेतीला पाणी मिळावे यासाठी धोमबलकवडी धरणाच्या पाण्यावर टिटेघर-कोर्ले उपसा जलसिंचन योजनेने पाणी पुरवले जाणार आहे. त्याचबरोबर हे पाणी ...

धोमबलकवडीच्या कालव्याला राहणार बारमाही पाणी
भोर: शेतीला पाणी मिळावे यासाठी धोमबलकवडी धरणाच्या पाण्यावर टिटेघर-कोर्ले उपसा जलसिंचन योजनेने पाणी पुरवले जाणार आहे. त्याचबरोबर हे पाणी कमी पडू नये यासाठी म्हाकोशी येथील बंधाऱ्यातून आणखी एक उपसा जलसिंचन योजना राबवली जाणार आहे. यामुळे धोमबलकवडी धरणाच्या कालव्याला बाराही महिने पाणी राहिली तसा प्रस्ताव शासनास सादर केला आहे त्यास लवकरच मान्यता मिळणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
आंबवडे खोऱ्यातील टिटेघर येथील दोन कोटी २० लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी टिटेघर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष केळकर व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. कार्यक्रमास कृष्णाजी शिनगारे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जि. प.सदस्य विठठल आवाळे, आनंदराव आंबवले, राजेश काळे, धनंजय वाडकर, सुभाष कोंढाळकर, बाळासाहेब शिंदे, नितीन दामगुडे, पांडुरंग धोंडे, चंद्रकांत मळेकर, अँड.राजेंद्र खोपडे, शिवाजी नाटंबे, लक्ष्मण पारठे, राजेंद्र घोलप उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले, या भागातील शेतीचे व बंधाऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रस्ताव शासनास सादर केले आहेत. तसेच रायरेश्वर किल्ल्यावरील सुविधांसाठी १ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मजूर होता. माञ त्याचे काम सुरुच झाले नव्हते म्हणून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असून हे काम आता मार्गी लागणार आहे. टिटेघर च्या शाळेला दुरुस्ती साठी १० लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या भागातील विकास कामांसाठी प्रस्ताव आणि निधी काँग्रेसने द्यायचा आणि त्याचे श्रेय सोशल मीडियाद्वारे दुसऱ्याने घ्यायचा असा प्रकार पहायला मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
संतोष केळकर म्हणाले, आम्ही कायम पराजयाचा खेळ- खेळलो. ज्यांना निवडून दिले त्यांनीच आम्हाला लाथ मारली. यापुढे ही चूक करणार नसून आमदार संग्राम थोपटे यांचे पाठीशी ठाम उभे राहून काँग्रेसला ताकद देण्याचे काम करणार आहे.
०५ भोर
आंबवडे टिटेघर रस्ता उदाघाटन करताना आ संग्राम थोपटे