‘महावितरण’च्या भोंगळपणाला धानोरी-लोहगावकर वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:00 AM2020-11-28T04:00:01+5:302020-11-28T04:00:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महावितरणच्या विश्रांतवाडी उपविभागात येणाऱ्या धानोरी-लोहगाव या परिसरातील वीज ग्राहक सध्या वैतागून गेले आहेत. एकीकडे वाढीव ...

Dhanori-Lohgaonkar was annoyed by the confusion of 'Mahavitaran' | ‘महावितरण’च्या भोंगळपणाला धानोरी-लोहगावकर वैतागले

‘महावितरण’च्या भोंगळपणाला धानोरी-लोहगावकर वैतागले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महावितरणच्या विश्रांतवाडी उपविभागात येणाऱ्या धानोरी-लोहगाव या परिसरातील वीज ग्राहक सध्या वैतागून गेले आहेत. एकीकडे वाढीव वीज बिलासंदर्भात राज्य शासन स्तरावर अद्याप स्पष्टता नाही. त्याचवेळी मीटर रिडिंग न घेतले जाणे, परस्पर बिले काढणे याचाही फटका या परिसरातील वीज ग्राहकांना बसला आहे. मीटर रिडिंग न झाल्याने बीले पाठवण्याचे प्रकार घडू लागल्याने वीज ग्राहकांनी या बिलांना थेट केराची टोपली दाखवण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकाराची पूर्ण माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना असूनही त्यांच्याकडून मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. यामुळे भरणा करण्याची तयारी असलेल्या प्रामाणिक वीज ग्राहकांना मनस्तापाचा सामना करावा लागतो आहे. महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारल्यानंतरही ग्राहकांना बिल दिले जात नाही. बिलाची प्रत मागितली असता ती उपलब्ध करुन दिली जात नाही.

धानोरी-लोहगावातल्या निम्म्याहून अधिक ग्राहकांच्या मीटरचे रिडिंगच अद्याप झालेले नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. तरीदेखील ग्राहकांना जुन्या बिलांच्या आधारे नवी बिले पाठवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र ग्राहकांच्या मते, यापुर्वीची बिले उन्हाळ्यातील आणि लॉकडाऊन काळातील असल्याने तेव्हाचे मीटर रिडिंग जास्त असण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यानंतर तसेच लॉकडाऊन उठल्यानंतर घरगुती विजेचा वापर तुलनेने कमी झाला आहे. त्यामुळे दर महिन्याचे मीटर रिडिंग व्यवस्थित होणे गरजेचे आहे. मात्र महिनोमहिने मीटर रिडिंग घेण्यासाठी कोणीही फिरकलेले नाही.

महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेतली गेलेली नाही. महावितरणच्या ढिल्या कारभारामुळे वीज ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. मीटर रिडिंगमधल्या भोंगळपणाची वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा धानोरी-लोहगाव परिसरातील वीज ग्राहकांनी दिला आहे.

अचूक वीज बिलांसाठी ग्राहक महावितरणच्या कार्यालयात गर्दी करु लागले आहेत. मात्र कार्यालयात गेल्यानंतरही योग्य बिले दिली जात नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे.

Web Title: Dhanori-Lohgaonkar was annoyed by the confusion of 'Mahavitaran'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.