कोरोना हॉटस्पॉटबाधित गावांत धडक सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:42+5:302021-07-14T04:13:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. रुग्णवाढीचा दर अजूनही ...

Dhadak survey in Corona hotspot affected village | कोरोना हॉटस्पॉटबाधित गावांत धडक सर्वेक्षण

कोरोना हॉटस्पॉटबाधित गावांत धडक सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. रुग्णवाढीचा दर अजूनही कायम आहे. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात आणि जवळपास ४०० गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. १०७ गावे हॉटस्पाॅट म्हणून जाहीर करण्यात आली असून, त्यात १० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. तसेच ३०० गावांत आजही कोरोनाबाधित असल्याने या गावांत मंगळवार आणि बुधवारी धडक सर्वेक्षण आणि नमुना तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि नगरपालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्याही जास्त आहे. अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबूनही कोरोनाबाधित आटोक्यात येत नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. हॉटस्पॉट गावात आणि बाधित गावात सर्वेक्षण मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहे. कोरोनाबाधित गावांमध्ये घरोघरी जाऊन एका व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. यासाठी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य सहायक, व आशा स्वयंसेविका यांचे पथक तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण येत्या दोन दिवस राबविले जाणार आहे. एका पथकामार्फत ५० घरांचे सर्वेक्षणे केले जाणार आहे. एका पथकात दोन जणांचा समावेश असूनण् नमुना घेणे व त्याची एसआरएफ आयडी जनरेट करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा सर्व डाटा बुधवारी (दि. १४) रात्रीपर्यंत आॅनलाईन पोर्टलवर नोंदवायची आहे. सर्वेक्षणासाठी गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोरोनाबाधित गावे, हॉटस्पॉट गावे यांचे घरनिहाय व पथकनिहाय सूक्ष्म आरखडा तयार करण्यात आला असून, तो तपास पथकाकडे देण्यात आला आहे.

चौकट

सुपर स्प्रेडर कार्यप्रणाली

सुपर स्प्रेडर सर्वेक्षण व नमुना तपासणीमध्ये एमआयडीसी, कारखाने क्षेत्रातील कामगार, मजूर, बँक कर्मचारी तसेच सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. आरोग्य अधिकारी यांनी यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यासोबतच अतिजोखीम व कमी जोखीम व्यक्तींच्या संपर्कातील सर्वांचीही तपासणी केली जाणार आहे. यासाठी तपास पथकाने ग्रामपंचायतीची मदत घेण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

चौकट

तालुकानिहाय हॉटस्पॉट गावांची संख्या (१० पेक्षा अधिक रूग्ण)

आंबेगाव १८, बारामती ६, दौंड १०, हवेली ८, इंदापूर १०, जुन्नर २६, खेड ६, मावळ १२, मुळशी १, पुरंदर १०, शिरूर ९

चौकट

तालुकानिहाय ३०० बाधित गावे

आंबेगाव २३, बारामती २९, भोर १२, दौंड १६, हवेली २३, इंदापूर ३०, जुन्नर ३५, खेड ३५, मावळ ३१, मुळशी ७, पुरंदर २६, शिरूर ३०, वेल्हा २

कोट

जिल्ह्यात हॉटस्पॉट गावे आणि बाधित गावातील कोरोना प्रसाराचा वेग नियंत्रणात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी ही सर्वेक्षण मोहीम मंगळवार (दि. १३) आणि बुधवारी (दि. १४) या दोन दिवसांत राबविली जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक घरातील एका व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे.

-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Dhadak survey in Corona hotspot affected village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.