खडकवासला धरणात बुडून युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: February 2, 2015 02:29 IST2015-02-02T02:29:49+5:302015-02-02T02:29:49+5:30
मित्रांसह खडकवासला धरणावर फिरावयास आलेल्या हृषीकेश संजय जाधव (वय १८, रा. उत्तमनगर) या महाविद्यालयीन युवकाचा

खडकवासला धरणात बुडून युवकाचा मृत्यू
खडकवासला : मित्रांसह खडकवासला धरणावर फिरावयास आलेल्या हृषीकेश संजय जाधव (वय १८, रा. उत्तमनगर) या महाविद्यालयीन युवकाचा धरणात पोहताना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. या आठवड्यातील ही सलग दुसरी घटना असल्याने चौपाटीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हृषीकेश आज दुपारी उत्तमनगर येथून त्याच्या तीन मित्रांसह खडकवासला धरण परिसरात फिरावयास आला होता. दुपारी तो पाण्यात पोहत होता. त्याचे मित्र काठावरच होते. मात्र काही वेळाने पोहताना त्याला जास्त दम लागल्याने त्याने मित्रांना मदत मागितली. मित्रांनी आरडाओरड सुरु केला.
संतोष रजपूत या त्याच्या मित्राने पोहता येत नसतानाही त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पर्यंत तेथीलच एका पर्यटकाने पोहत जाऊन तातडीने हृषिकेशला पाण्याबाहेर काढले. त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्यास तातडीने उत्तमनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयत हृषीकेश हा कोथरुड येथील पी. जोग कॉलेजमध्ये बारावीत शिकत होता. त्याला चांगले पोहताही येत होते. असे फौजदार जगनाथ अहिरे यांनी सांगितले.