‘संतसूर्य तुकाराम’, ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ पुस्तक नष्ट करा

By Admin | Updated: June 10, 2014 15:04 IST2014-06-10T00:55:54+5:302014-06-10T15:04:22+5:30

‘संतसूर्य तुकाराम’ व ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ पुस्तकात कपोलकल्पित बदनामीकारक कथा, मजकूर लिहिल्याबद्दल लेखक व प्रकाशक यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच पुस्तके फाडून नष्ट करावीत, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांनी दिला आहे.

Destroy the book 'Santusuri Tukaram', 'Lokaskha Dnyaneshwar' | ‘संतसूर्य तुकाराम’, ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ पुस्तक नष्ट करा

‘संतसूर्य तुकाराम’, ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ पुस्तक नष्ट करा

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांचा आदेश : संतांविषयी बदनामीकारक लेखन
देहूगाव (पुणे) : संतश्रेष्ठ तुकाराममहाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांच्यावरील आनंद यादवलिखित ‘संतसूर्य तुकाराम’ व ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ पुस्तकात कपोलकल्पित बदनामीकारक कथा, मजकूर लिहिल्याबद्दल लेखक व प्रकाशक यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच पुस्तके फाडून नष्ट करावीत, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांनी दिला आहे. वाड्मयीन क्षेत्राविषयीचा भारतातील अशाप्रकारचा हा पहिलाच ऐतिहासिक निकाल आहे. तुकोबारायांचे वंशज संभाजीमहाराज मोरे यांनी संतांच्या बदनामीचे प्रकरण उघडकीस आणले होते. परिणामी यादव यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सोडावे लागले होते.
संत तुकाराममहाराजांची बदनामी केल्याप्रकरणी 7 एप्रिल 2009 रोजी लेखक आनंद यादव, मेहता पब्लिशिंगचे मालक सुनील अनिल मेहता व हक्कदार स्वाती यादव यांच्याविरुद्ध एक कोटी रुपयांचा दावा संत तुकाराम महाराजांचे वंशज जयसिंग विश्वनाथ मोरे यांनी दाखल केला होता. या दोन्ही दाव्यांची अनुक्रमे पाच वर्षे 1 महिना व 4 वर्षे 11 महिने सुनावणी सुरू होती. 27 मे रोजी निकाल लागला. या निकालाची प्रत नुकतीच मोरे यांना मिळाली आहे.
‘संतसूर्य तुकाराम’ व ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ या पुस्तकांमध्ये लेखक आनंद यादव यांनी अत्यंत अश्लील व गलिच्छ भाषेत बदनामी केली असून, या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील मेहता पब्लिशिंगचे मालक सुनील अनिल मेहता यांनी केले असून, या पुस्तकाचे हक्कदार स्वाती यादव यांनीदेखील ही बदनामी केल्याचा आरोप जयसिंग मोरे यांनी दाव्यात केला होता. त्यानुसार सर्व साक्षी पुरावे तपासले. लेखक, प्रकाशकांना कोणताही ठोस पुरावा देता आला नाही. म्हणून न्यायाधीश जैन यांनी त्यांना दोषी ठरविले. स्वाती यादव यांचे नाव पुस्तकात हक्कदार म्हणून असले, तरी पुस्तकाचे हक्क असलेला कोणताही लेखी पुरावा त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे त्यांची निदरेष मुक्तता झाली आहे.
फिर्यादीतर्फे शशिकांत पुराणिक, विनायक कुलकर्णी, संभाजीमहाराज मोरे, जालिंदर मोरे, दिनेश रंधवे, माधवमहाराज शिवणीकर, रमेश बावकर, विलास दीक्षित, दीपक वर्मा, नरहरी चौधरी, ज्ञानेश्वर नामदास आदी 12 साक्षीदार तपासले व अनेक पुस्तकांचा संदर्भ म्हणून वापर केला गेला. हे सर्व साक्षीपुरावे तपासल्यानंतर न्यायाधिशांनी लेखक व प्रकाशकांना दोषी ठरविले. त्यांना 15 हजार रुपयांचा जामीन व तेवढय़ाच रकमेचा मुचलका द्यावा, असा निकाल दिला आहे. त्याचप्रमाणे दोन्ही पुस्तकांच्या प्रती फाडून नष्ट कराव्यात, असा आदेश दिला. 

Web Title: Destroy the book 'Santusuri Tukaram', 'Lokaskha Dnyaneshwar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.