निधी देऊनही बंधाऱ्यांना ढापे बसलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:31+5:302020-11-28T04:04:31+5:30
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पुणे जिल्हा परीषदेच्या अंतर्गत लघु पाटबंधारे विभागाने ओढ्यावरील कोल्हापूर बंधारे, वळण बंधारे अडविण्यासाठी संबधित ग्रामपंचायतीना ...

निधी देऊनही बंधाऱ्यांना ढापे बसलेच नाही
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पुणे जिल्हा परीषदेच्या अंतर्गत लघु पाटबंधारे विभागाने ओढ्यावरील कोल्हापूर बंधारे, वळण बंधारे अडविण्यासाठी संबधित ग्रामपंचायतीना आवश्यक लागणारा निधी पाठवुनही बंधाऱ्यांना ढापे बसवण्यात आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे या गावातील नद्यांवर, ओढ्यांवर पाणी न साठल्याने टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
खेड तालुक्यात बंधाऱ्यांवर ढापे बसवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींना निधी देण्यात आला. मात्र, हे ढापे बसवले नसल्याने अनेक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खेड तालुक्यात खेड पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागाचे ४२ गावाचे हद्दीतील ओढे, नाल्यावरील ७९ बंधाऱ्यांना सर्वसाधारण पणे वहात्या जलस्त्रोतचा अंदाज घेऊन लोखंडी ढापे बसवुन पाणी अडविले जात असते. यापुर्वी जिल्हास्तरावर निविदा प्रक्रीया करुन ठेकेदारामार्फत बंधारे अडविणे आणि पावसाळ्यापुर्वी ढापे काढुन ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिले जात असत. मात्र, अनेकदा ठेकेदारांच्या दिरगांईमुळे ढापे बसवुनही पुरेशा पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होत नव्हता. तर काढलेले ढापे चोरीला गेले आहेत. जलसंधारण लघु पाटबंधारे विभागाच्या गैर कारभाराचा फटका परीसरातील शेतकऱ्यांना बसत होता. अखेर गेल्या दोन वर्षांपासूण बंधारे अडविण्याची ढापे बसवण्याची कामे ठेकेदारी पध्दत बंद करुन थेट ग्रामपंचायतीना या साठी निधी देण्यात येऊ लागला. ढापे योग्य वेळेत आणि पावसाळ्यापुर्वी काढण्याची जबाबदारी दिल्यामुळे वेळेत बंधारे अडण्याबरोबरच ढाप्यांची चोरी झाली तर ग्रामपंचायतीवर ठपका येऊ नये म्हणुन लोखंडी ढाप्यांची सुरक्षितता भक्कम झाली. यासाठी जिल्हा परीषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने पाणी अडविण्यासाठी बंधारयांचे ढापे काढण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निधी वर्ग केला जात असल्याने दरवर्षी ग्रामपंचायतीने ढापे वेळेत लावणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा अनेक गावांचे बंधाऱ्यांवर ढापे लावण्यात आले नसून पाणी अडविले नसल्याच्या तक्रारी आल्या. परतीच्या पावसा मुळे यंदा जलस्त्रोत बऱ्यापैकी पाणी आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने यंदा वेळेत बंधाऱ्यांना ढापे बसवण्यात आले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहे.
कोट
तालुक्यातील बंधारे अडविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे गेल्या महिन्यात निधी वर्ग करण्यात आला.
पाणी अडविण्याबाबत ढापे बसविण्यासाठी ग्रामसेवकांशी संपर्क करुन, ग्रामपंचायतीना स्मरणपत्रे देण्यात आली आहेत. तीस ते पस्तीस टक्के बंधाऱ्यांवर ढापे बसवण्यात आले आहेत आणि पाणी अडविण्यात आले आहे.
-ज्ञानेश्वर उभे, शाखा अभियंता
चौकट
तालुक्यातील गावे आणि बंधारे ढापे बसविणे आणि काढण्यासाठी आलेला निधी : आडगाव ( १६८४७), आखरवाडी (११२३०), आंबोली (२७३७४), औदर (४९१४), बहिरवाडी (१६८४७), बहुळ (११२३०), भलवडी (७७९११), भिवेगाव (१०३१८०), चिंचोशी (११२१४), डेहणे (२२४६१), देवोशी (५२६४३), घनवटवाडी (१२६३४), घोटवडी (१९६५३), जऊळके (१२६३४), कडाचीवाडी (१६१४४), कडुस (९५४५८), काळेचीवाडी (८५६३२), कळमोडी (५८९६०), कमान (२८०७६), कनेरसर (७९३१५), कान्हेवाडी (११२३०), खरपुड (१६८४७), खरपुडी (५६१५), कोहिंडे बु.(१७५४८), कोये (४९१३३), मोरोशी (५६१५), नायफड (१९६५३), पाळु (१२६३४), पापळवाडी (८४२४), पुर (४२११), रासे (२३१६३), साबुर्डी (१४०३८), वेताळे (४१९१५), वरचे भोमाळे (२३१६३), वरुडे (१८०३८८), वाफगाव (९४०५५), वांद्रा (२८७७७), येणिये खु (४२११४), येणिये बु.(३७२००).
चौकट
खेड तालुक्यात २४ नोव्हेबर अखेर ४२ ग्रामपंचायतीचे अखत्यारीत येणाऱ्या कोल्हापुर पध्दतीचे बंधारे २५ पैकी १४ बंधाऱ्यांचे ढापे बसवण्यात आले. वळण बंधाऱ्याचे २५ पैकी ९ बंधारे अडविण्यात आले तर साठवण २९ बंधाऱ्यां पैकी ९ बंधारे अडविण्यात आले. तर हे बंधारे अडविणे आणि ढापे काढण्यासाठी १४ लाखांचा निधी ग्रामपंचायतीना वर्ग होऊन सुध्दा अद्यापही काही ग्रामपंचायतीनी वेळेत बंधारे अडविण्याची कार्यवाही केलेली नाही.