मुबलक जमिनी असूनही घेता येईना पीक!
By Admin | Updated: August 14, 2014 04:28 IST2014-08-14T04:28:45+5:302014-08-14T04:28:45+5:30
येथील औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच दूषित पाणी सोडून देतात

मुबलक जमिनी असूनही घेता येईना पीक!
कुरकुंभ : येथील औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच दूषित पाणी सोडून देतात. त्यामुळे कुरकुंभकरांना मुबलक जमिनी असून, त्या जमिनीत पीक येत नाही, अशी व्यथा येथील शेतकऱ्यांना लोकमतशी बोलताना व्यक्त केली. सुमारे १ हजार एकर क्षेत्र नापीक झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून जमिनी ओस पडल्या आहेत. शासनाला वेळोवेळी या भागातील शेतकऱ्यांनी निदर्शनास आणूनदेखील शासनाच्या उदासीनपणाचा फटका येथील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
औद्योगिक वसाहतीत रासायनिक प्रकल्पातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे सांडपाणी शुद्धीकरण केंद्र कार्यरत आहे. औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी या ठिकाणी गोळा केले जाते आणि त्यानंतर प्रक्रिया झालेले पाणी झाडासाठी वापरले जाते. परंतु, पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने उर्वरित पाणी मोकळ्या भूखंडावर वाहून येते. परिणामी, मोकळ््या भूखंडावर दलदल निर्माण झाली आहे. तर, काही कंपन्यांचे सांडपाणी शुद्धीकरण न करताच सोडले जाते. त्यामुळे जमिनी नापीक होऊन शेतीचा प्रश्न भेडसावत आहेत. सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढवून सर्वच कंपन्यांनी आपले सांडपाणी प्रक्रियेसाठी पाठवावे, तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया झालेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. प्रदूषणाच्या विळख्यात कुरकुंभ परिसरातील जनता अडकलेली असल्याची परिस्थिती आहे. (वार्ताहर)