इच्छुकांचे डोळे लागले यादीकडे

By Admin | Updated: January 30, 2017 03:10 IST2017-01-30T03:10:11+5:302017-01-30T03:10:11+5:30

युती तुटल्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतील अनेक इच्छुकांना आनंदाचे भरते आले आहे. जल्लोष करून त्यांनी स्वतंत्रता साजरी केलीच, पण आता त्यांच्यातील इच्छुकांचे डोळे

Desire of wanting eyes | इच्छुकांचे डोळे लागले यादीकडे

इच्छुकांचे डोळे लागले यादीकडे

पुणे : युती तुटल्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतील अनेक इच्छुकांना आनंदाचे भरते आले आहे. जल्लोष करून त्यांनी स्वतंत्रता साजरी केलीच, पण आता त्यांच्यातील इच्छुकांचे डोळे उमेदवारांच्या यादीकडे लागले आहेत. बऱ्याच वर्षांची इर्षा समोरासमोर काढण्याची संधी मिळाल्याने दोन्ही पक्षांतील अनेक संभाव्य उमेदवार तयारीलाही लागले आहेत.
सांगताही येत नाही व सहनही करता येत नाही, अशा युतीतील अनेकांची स्थिती होती. काहींनी यापुर्वीच्या निवडणुकीत बंडखोरीही करून पाहिली, पण पक्षाची मते मिळाली नसल्याने त्यांना अपयश पाहावे लागले. आता पक्ष बरोबर आहे, मैदान मारणारच असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. शहराच्या मध्यभागातील प्रभागांमध्ये प्रामुख्याने ही लढाई रंगणार, असा काहींचा होरा आहे. तिथे भाजपाचे वर्चस्व आहे, मात्र ते शिवसेनेच्या सहकार्यातून तयार झाले होते, आता शिवसैनिक फक्त शिवसेनेचाच प्रचार करतील व त्यातून खरी ताकद कोणाची ते समजून येईल, असे सांगण्यात येत आहे.
भाजपाच्या गोटातही या लढाईचा सामना कसा करायचा, यावर मंथन सुरू झाले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासमवेत शहराच्या पेठांमधील जनसंघापासूनच्या काही ज्येष्ठांची एक बैठक झाली असल्याची माहिती मिळाली. परिवारातील अनेक संघटनांचे पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. मतदार आपलाच आहे, शिवसेनेवर टीका करून त्याला अस्वस्थ करायचे नाही, असा निर्णय या बैठकीत झाला असल्याचे समजते. आपला उमेदवार घरोघरी कसा जाईल, याची आखणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
दोन्ही पक्षातील नेत्यांच्या स्तरावरही याची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेने आक्रमकपणा न सोडता भाजपावर टीकेचा भडिमार करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील १० वर्षांत भाजपानेच काँग्रेस व राष्ट्रवादीला वेळोवेळी साथ दिली, त्यामुळेच शहराचा विकास खुंटला, या मुद्द्यावरून भाजपाला जेरीस आणायचा शिवसेनेच्या नेत्यांचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येते. परिवर्तन मोर्चाला याच मुद्द्यावर नागरिकांची साथ मिळाली, त्यामुळे तोच मुद्दा घेऊन पुढे जाण्याचे ठरवण्यात आले आहे. पोस्टर, पत्रके तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती मिळाली.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पदाधिकारी व उमेदवार, कार्यकर्त्यांना घाई करू नका, असा सल्ला दिला आहे.



ते काय करतात ते पाहून नंतर प्रतिक्रिया द्या, ती मुद्देसूद असेल याची काळजी घ्या, असे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. स्वत: होऊन शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराच्या वाटेला जाण्याचे कारण नाही, मात्र त्यांच्याकडून आरोप झाल्यानंतर ऐकूनही घ्यायचे नाही, अशा प्रकारे सामना करण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Desire of wanting eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.