प्रश्न : पुण्याचे जिल्हाधिकारी थेट आयएएस अधिकारी असणार की प्रमोटी अधिकारी खूप चर्चा होती. पुण्यात विभागीय आयुक्तासह दोन्ही महापालिकेचे आयुक्त थेट आयएएस अधिकारी आहेत. याचे दडपण वाटते का ?- : या विषयावर मला काहीच बोलायचे नाही, पण येणाऱ्या काळात माझे कामच बोलेल व माझी योग्यता सिद्ध करेल. माझा टीमवर्कवर विश्वास असून, सर्वांना बरोबर घेऊन, लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन काम करण्याची पध्दत आहे. प्रश्न कितीही गंभीर असला तरी समन्वय साधून टीमवर्क केले की यश नक्कीच मिळते.
प्रश्न : राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असताना पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून तुमची निवड झाली आहे. कोरोनाचे हे आव्हान कसे स्वीकारणार ? - : सध्या कोरोनामुळे पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण देश आणि जगासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पुण्याची रुग्ण संख्या राज्यात सर्वाधिक असून, कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणणे मोठे आव्हान असल्याची जाणीव आहेच. रुग्ण संख्या अधिक असली तरी राज्यात सर्वाधिक कोरोना चाचण्या पुणे जिल्ह्यातच होत आहेत. तसेच रुग्णांना त्वरीत उपचार उपलब्ध करून देणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या कामाला अधिक गती देण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांचा सहभाग खूप महत्त्वाचा भाग आहे. सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर या गोष्टी गांभीर्यने घेतल्या पाहिजेत.
प्रश्न : पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना कोणत्या घटकांना प्राधान्य देणार. कोणते प्रकल्प, योजना राबविणार व आव्हाने कोणती वाटतात ?- : पुण्यात सध्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तातडीने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या उपाय योजना करू. परंतु कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सर्वच विकास कामांना खीळ बसली आहे. आता या विकास कामांना गती देण्यासाठी वेगाने काम करणार.मला स्वत: ला हार्डवर्क करण्याची सवय आहे. यामुळेच तहसिलदारापासून सर्व प्रांताधिकारी यांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासला गती देणार.