वाळुंजवाडीला २८ वर्षापासून विकासापासून वंचित ठेवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:15+5:302021-01-13T04:26:15+5:30
मंचर: आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी या महसुली गावाला मागील २८ वर्षांपासून शासनाच्या निधी मिळाला नाही. त्यामुळे विकासकामे झाली नाही. ...

वाळुंजवाडीला २८ वर्षापासून विकासापासून वंचित ठेवले
मंचर: आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी या महसुली गावाला मागील २८ वर्षांपासून शासनाच्या निधी मिळाला नाही. त्यामुळे विकासकामे झाली नाही. विशेष म्हणजे या गावचा निधी वाळुंजनगर गावाला दिल्याचा आरोप वाळुंजवाडी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पत्रकार परिषदेला माजी सरपंच रुक्मिणी खंडागळे , माजी उपसरपंच सोनाली वाळुंज, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, बाळासाहेब लोंढे, नवनाथ वाळुंज, भिमराव वाळुंज, जीवन निघोट, मनोहर लोंढे, सागर वाळुंज, कांतीलाल वाळुंज, प्रकाश वाळुंज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वाळुंजवाडी आणि वडगाव काशिंबेग या दोन गावांसाठी एक ग्रामपंचायत होती. वडगाव काशिंबेग गावची लोकसंख्या दोन हजार ७१७ व वाळुंजवाडी गावची लोकसंख्या एक हजार २६ अशी एकूण लोकसंख्या तीन हजार ७४३ होती. त्यानुसार सदर ग्रामपंचायत वडगाव काशिंबेगकडे दोन्ही गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत निधी शासनाकडून उपलब्ध होणे गरजेचे होते. परंतु आज अखेर केवळ वडगाव काशिंबेग गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत निधी आल्याने सदर तुटपुंज्या निधीमुळे गावचा विकास अनेक वर्ष रखडला असल्याची माहिती नवनाथ वाळुंज यांनी दिली.
वडगाव काशिंबेग पासून वाळुंजवाडीला १७ फेब्रुवारी २०२०ला विभक्त करण्यात आले. त्यानंतर नव्याने वाळुंजवाडी ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर तेथील तरुणांच्या व ग्रामस्थांच्या निधी मिळत नसल्याची गोष्ट निदर्शनास आली. गेली २८ वर्षे वाळुंजवाडी गावात लोकसंख्येच्या तुलनेत मिळणारा सर्व निधी दुसऱ्या गावच्या विकासासाठी स्वतंत्र स्थापन केलेल्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत नवनाथ वाळुंज यांनी गटविकास अधिकारी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असल्याचेही ग्रामस्थांनी म्हंटले.
सखोल चौकशी करणार
वाळुंजवाडी ग्रामस्थांनी आरोप केल्यानंतन आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वाळुंजवाडीला २८ वर्षापासून शासनाचा निधी न मिळणे अशक्य आहे. परंतु, तसे काही झाले असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल. त्याचबरेाबर यामागील कारणही शोधले जाईल.