शिफारशींअभावी गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित
By Admin | Updated: October 27, 2015 01:13 IST2015-10-27T01:13:32+5:302015-10-27T01:13:32+5:30
रुबी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल (कर्वे रोड), एम्स हॉस्पिटल (औंध) यांना महापालिकेने ०.५० जादा एफएसआय दिला आहे, या बदल्यात त्यांनी दररोज २७ बेड गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

शिफारशींअभावी गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित
पुणे : रुबी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल (कर्वे रोड), एम्स हॉस्पिटल (औंध) यांना महापालिकेने ०.५० जादा एफएसआय दिला आहे, या बदल्यात त्यांनी दररोज २७ बेड गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र महापालिकेकडून त्याकरिता शिफारशीच पाठविल्या जात नसल्याने वर्षभरात केवळ ५५ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे सुविधा उपलब्ध असूनही गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आला आहे.
रुबी हॉस्पिटलमध्ये १२, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ५ तर एम्स हॉस्पिटलमध्ये १० बेड अशा एकूण २७ बेड दररोज गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार दरवर्षी त्यांनी दहा हजार गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात २०१४-१५ मध्ये रुबी हॉलमध्ये ३६ तर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये १९ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती उजेडात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना या सुविधेची माहितीच दिली जात नाही. त्यामुळे खासगी हॉस्पिटलचा फायदा होत आहे. यापूर्वी दोन वेळा याप्रकराविरुद्ध तक्रार करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आरोग्यप्रमुखांना निलंबित करावे अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केली. या वेळी विश्वास सहस्रबुद्धे उपस्थित होते.
आरोग्य प्रमुखांच्या शिफारशीवरून गरीब रुग्णांवर या हॉस्पिटलनी मोफत उपचार करावेत, अशी तरतूद आहे. या योजनेची माहिती देणारे फलक या हॉस्पिटल बरोबरच महापालिका, सर्व क्षेत्रीय कार्यालये, महापालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने याठिकाणी लावण्यात यावेत अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली. महापालिकेकडे जर हे फलक लावण्यासाठी पैसे नसतील तर त्यांनी तसे स्पष्ट करावे, सजग नागरिक मंच स्वत:च्या पैशांमधून हे फलक उभारेल, असे वेलणकर यांनी स्पष्ट केले.
गरीब रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा असूनही त्यांना त्यापासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार सजग नागरिक मंचच्या वतीने १६ डिसेंबर २०१३ व १७ जुलै २०१४ रोजी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. मात्र तरीही त्यांनी त्यामध्ये लक्ष घातले नाही, त्यामुळे आरोग्यप्रमुखांना आयुक्तही पाठीशी घालत आहेत, असा आरोप वेलणकर यांनी या वेळी केला.