पुणे जिल्ह्यात आठ दिवसांत शंभर टक्के निराधार लोकांच्या बँक खात्यात अनुदान जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST2021-05-14T04:10:24+5:302021-05-14T04:10:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लाॅकडाऊन व कोरोनाचे संकट यामुळे समाजातील दुर्बल व गरीब कुटुंबाची उपासमार होऊन नये यासाठी ...

पुणे जिल्ह्यात आठ दिवसांत शंभर टक्के निराधार लोकांच्या बँक खात्यात अनुदान जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लाॅकडाऊन व कोरोनाचे संकट यामुळे समाजातील दुर्बल व गरीब कुटुंबाची उपासमार होऊन नये यासाठी महाआघाडी सरकारने सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील ८७ हजार ३८१ लाभार्थ्यांसाठी २० कोटी २३ लाख ४२ हजार ७० रुपयाचे अर्थसहाय आठ दिवसांतच उपलब्ध करून दिले आहे.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन २०२१-२२ या वर्षामध्ये आर्थिक व दुर्बल घटकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना इत्यादी योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल व मे २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीचे अर्थसहाय्य एकत्रितपणे वितरण करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येणाऱ्या सामाजिक व विशेष अर्थसहाय्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले रुपये २० कोटी २३ लाख ४२ हजार ७० रुपयाचे अनुदान १४ तालुक्यांना वितरित केले.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना या पाच योजनेच्या लाभार्थ्यांना हे अनुदान मिळाले आहे.
--
जिल्ह्यातील योजनानिहाय लाभार्थी संख्या
संजय गांधी निराधार योजना - ४३७८७
श्रावणबाळ योजना - ३२३६८
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना - १०३२६
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना - ७७३
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना - १२५
--
आठ दिवसांत शंभर टक्के लाभार्थ्यांना अनुदान वाटप
कोरोना आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनुदानाची रक्कम उपलब्ध झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी तातडीने दोन-तीन दिवसांत अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक तालुक्याचे नियोजन करून तहसीलदारांमार्फत आठ दिवसांत शंभर टक्के लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले.
- संजय तेली, उपजिल्हाधिकारी