समाजविकासासाठी दिली बहिणीची जमा बचत रक्कम
By Admin | Updated: February 9, 2017 02:58 IST2017-02-09T02:58:01+5:302017-02-09T02:58:01+5:30
काळेवाडी (ता. पुरंदर) येथील बाळासाहेब काळे यांनी त्यांची मृत बहीण विमल मधुकर कोकाटे यांचे बचतीचे १ लाख २६ हजार रुपये परिसरातील विविध समाजविकास कामांसाठी देऊन

समाजविकासासाठी दिली बहिणीची जमा बचत रक्कम
गराडे : काळेवाडी (ता. पुरंदर) येथील बाळासाहेब काळे यांनी त्यांची मृत बहीण विमल मधुकर कोकाटे यांचे बचतीचे १ लाख २६ हजार रुपये परिसरातील विविध समाजविकास कामांसाठी देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
समाजात माणसांमाणसांमध्ये विविध कारणांवरून संघर्ष, वादविवाद, मतमतांतरे होत आहेत. सध्या माणसे माणसांच्या जिवावर उठून ऐकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. माणुसकीचा झराही आटत चालला आहे. सगळ्या प्रकारच्या नात्यांमध्येही कटूता वाढू लागली आहे. अशा वातावरणातही माणुसकी, चांगले विचार टिकून आहेत. समाजहिताची तळमळ असणारी काही माणसे आपल्या वागणुकीने अनेकांची मने जिंकतात. असेच एक दुर्मिळ उदाहरण काळेवाडीत घडले.
बाळासाहेब काळे यांच्या थोरल्या भगिनी विमल कोकाटे यांचे वयाच्या ७८व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ३५ वर्षे ससून रुग्णालयात आया म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या मागे कोणीही वारसदार नव्हते. त्या आपला भाऊ बाळासाहेब काळे यांच्याकडेच राहत होत्या. त्यांनी बँकेमध्ये बचत करून १ लाख २६ हजार रुपयांची रक्कम ठेवली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ही रक्कम समाजाविकासासाठी खर्च करू, असा विचार बाळासाहेब काळे यांनी बहीण कुसुम मोडक, पत्नी शोभा, मुलगा रमाकांत, सून राजश्री यांच्यापुढे मांडला. या सर्वांनी त्याला तत्काळ होकार दिला.
त्याप्रमाणे काळेवाडी येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी ५१ हजार रुपये सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र काळे यांच्याकडे दिले. दिवे येथील जीवनवर्धिनी मतिमंद विद्यालयाच्या नवीन शाळा बांधकामासाठी ५१ हजार रुपये मुख्याध्यापक बाळासाहेब झेंडे यांच्याकडे दिले.
काळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक सुधारणेसाठी १५ हजार मुख्याध्यापिका राजश्री मोरे यांच्याकडे दिले. तर, जाधववाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळाविकासासाठी ११ हजार रुपये मुख्याध्यापक सुनील लोणकर यांच्याकडे दिले.
बाळासाहेब काळे हे मूळचे दिवे गावाजवळील काळेवाडीचे रहिवासी आहेत. ते भोर तालुक्यातील किकवी येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात ३२ वर्षे सेवा करून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते काळेवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयाचे नियोजन व शेतीव्यवसाय सांभाळतात.(वार्ताहर