सुपे परिसरात डेंगीसदृश रुग्ण
By Admin | Updated: February 4, 2015 00:21 IST2015-02-04T00:21:53+5:302015-02-04T00:21:53+5:30
मागील आठवड्यात दोन ते तीन डेंगीसदृश रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्वरित उपाययोजना राबविण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली.

सुपे परिसरात डेंगीसदृश रुग्ण
सुपे : सुपे (ता. बारामती) परिसरात मागील आठवड्यात दोन ते तीन डेंगीसदृश रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्वरित उपाययोजना राबविण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली.
मागील आठवड्यात सुपे येथील एक ग्रामस्थ तब्येत बरी नसल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. या वेळी त्याच्या रक्ताच्या चाचण्या करण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. व्ही. झेंडे यांनी दिला. या वेळी त्याला रक्ताच्या चाचण्यांमध्ये डेंगीची लागण झाल्याचे आढळले. त्याला ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
येथील खासगी हॉस्पिटलमध्ये खैरेपडळ (ता. बारामती) येथील एकास डेंगीची लक्षणे आढळून आली होती. त्यास पुढील उपचारासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. गणेश लोणकर यांनी दिली. त्यामुळे सुपे व खैरेपडळ या ठिकाणी फॉगिंग मशिनने धुरळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. पी. वाघमारे यांनी सांगितले, की सुपे परिसर आणि खैरेपडळ येथे डेंगीचे रुग्ण आढळून आले होते. त्यानुसार खालची पेठ आणि आरोग्य विभागाच्या वतीने सर्व्हेक्षणाचे काम करण्यात आले. या वेळी खालच्या पेठेत एसटी स्टँड परिसरातील हनीफ हुसेन पिरजादे यांच्या घरातील साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये लारवा आढळून आल्या. याबाबत आरोग्य सेवक एस. एस. काशिद यांनी माहिती दिली.