‘डेमू’ चार तास उशिरा
By Admin | Updated: April 29, 2017 04:01 IST2017-04-29T04:01:01+5:302017-04-29T04:01:01+5:30
अगोदरच दोन तास उशिरा धावणाऱ्या पुणे-दौंड डेमूला रेल्वे प्रशासनाने गुरुवारी सुमारे दीड तास थांबा दिला. पाठीमागून पाच एक्स्प्रेस

‘डेमू’ चार तास उशिरा
केडगाव : अगोदरच दोन तास उशिरा धावणाऱ्या पुणे-दौंड डेमूला रेल्वे प्रशासनाने गुरुवारी सुमारे दीड तास थांबा दिला. पाठीमागून पाच एक्स्प्रेस गाड्या दौंडकडे मार्गस्थ झाल्या. त्यामुळे डेमूतील हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. नको हा प्रवास अशा संतप्त भावना आता प्रवासी व्यक्त करीत आहेत.
दुपारी २.४० मिनिटांनी पुणे स्थानकातून दौंडकडे रवाना होणारी डेमू (क्रमांक ७१४०९) सायंकाळी ४.३० मिनिटांनी निघाली. पाठीमागे मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस गाडी असूनही लवकर घरी पोहोचू या अपेक्षेने दौंड तालुक्यातील अनेक प्रवासी या डेमूमध्ये बसले. गाडी लोणीकाळभोर येथे आली असता प्रशासनाने नागरकोईल, हैदराबाद व झेलम, सोलापूर या ४ एक्स्प्रेस लागोपाठ पुढे काढल्या. त्यामुळे या स्थानकात डेमू तब्बल दीड तास उभी राहिली.
यामुळे दौंडकडे जाणाऱ्या प्रवाशांचा उद्रेक झाला. त्यांनी इंजिन ड्रायव्हरशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. प्रवासी रेल्वे रुळाच्या मधोमध आले. ही बाब पुणे येथील प्रशासनास लक्षात आल्यावर चौथी पुणे सोलापूर इंटरसिटी गाडी ओव्हरटेक करण्याऐवजी मधल्या रुळावर या गाडीस थांबा दिला. त्यानंतर कंटाळलेले हजारो प्रवासी या एक्स्प्रेसमध्ये बसले. दौंडपर्यंत प्रत्येक स्थानकावर या एक्स्प्रेसला थांबा प्रवाशांनी चेन पूल करून थांबा दिला. शेवटी डेमू सायंकाळी ६.४५ वाजता दौंडकडे निघाली. या गाडीमध्ये मात्र बोटावर मोजण्याइतके प्रवासी शिल्लक होते.