खडकवासला कालवा परिसरात जमावबंदी; अनधिकृत पाणी उपसणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:19 AM2024-04-24T10:19:28+5:302024-04-24T10:20:16+5:30

खडकवासला धरणातून ४ एप्रिलपासून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे...

Demonstration in Khadakwasla Canal area; Three unauthorized water collectors were taken into custody | खडकवासला कालवा परिसरात जमावबंदी; अनधिकृत पाणी उपसणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात

खडकवासला कालवा परिसरात जमावबंदी; अनधिकृत पाणी उपसणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात

पुणे :खडकवासला उजव्या कालव्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना शिर्सुफळ येथे ताब्यात घेण्यात आले आहे. हा अनधिकृत उपसा थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी खडकवासलाधरण ते इंदापूरपर्यंतच्या संपूर्ण कालवा परिसरात जमावबंदी प्रतिबंधक १४४ कलम लागू केले आहे. पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी हे आदेश जारी केल्याचे दिवसे यांनी स्पष्ट केले आहे.

खडकवासला धरणातून ४ एप्रिलपासून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे; मात्र आवर्तन सुरू असताना इंदापूरपर्यंत कालव्यातून दोन्ही बाजूंनी अनधिकृत पाणी उपसा सुरू असल्याचे जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नवाडकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांच्यासह या कालवा परिसराची पाहणी केली. त्यानुसार मंगळवारी वरवंड, भिगवण तसेच शिर्सुफळ येथे कारवाई करण्यात आली. त्यात तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वरवंड व भिगवण येथे गेट उघडून बेकायदेशीर पाणी उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पुणे पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांनी कालवा परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी विनंती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि गैरप्रकार थांबावेत यासाठी दिवसे यांनी या संबंधी २०२ किलोमीटरच्या परिसरात दोन्ही बाजूंनी ५० मीटर क्षेत्रात कलम १४४ लागू करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. तसेच अनधिकृत पाणी उपसा थांबविण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी पाणी उपसा बंद करू नये तसेच वीज कापू नये, अशी मागणी कुऱ्हाडे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Demonstration in Khadakwasla Canal area; Three unauthorized water collectors were taken into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.